राजकीय सेटिंग नाही, पण महेश लांडगेंच्या घाटात आमदार सुनील शेळकेंना बोलेरोचे बक्षीस!

Mahesh Landge | Sunil Shelke : भाजप आमदारांच्या बैलगाडा शर्यतीतील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैलगाड्याने केली बक्षिसांची लयलुट
राजकीय सेटिंग नाही, पण महेश लांडगेंच्या घाटात आमदार सुनील शेळकेंना बोलेरोचे बक्षीस!
Mahesh Landge | Sunil ShelkeSarkarnama

पिंपरी : दीड कोटी रुपये बक्षीसांच्या पाच दिवस चाललेल्या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची सांगता काल (मंगळवारी) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे झाली. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) व पिंपरी-चिंचवडचे भाजपचे पहिले व दुसरे माजी महापौर अनुक्रमे नितीन काळजे व राहुल जाधव यांनी आयोजित या शर्यतीचे आयोजन केले होते.

मात्र भाजप आमदारांनी आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये लाखो रुपयांच्या मोठ्या बक्षीसांची लयलूट राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेश सचिव रामनाथ वारिंगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) व पक्षाच्या मावळातील इतर पदाधिकाऱ्यांच्या बैलगाड्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेले मावळातील रामनाथ वारिंगे यांचा बैलगाडा पहिल्या नंबरात आला. त्यामुळे तो बैलगाडा २५ लाखाचे इनाम असलेल्या जेसीबीचा मानकरी ठरला. तर, मावळातील बाबूराव वायकर यांचा गाडाही पहिल्या नंबरात बसला. ते नुकतीच टर्म संपून प्रशासक लागू झालेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती आहेत. पहिला नंबर आल्याने त्यांनी आनंद तर व्यक्त केलाच, पण आठ वर्षानंतर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाल्याने सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना त्यांचा तो आनंद ओसंडून वाहत होता.

आ. शेळके यांचा गाडा १२ लाख रुपयांची बोलेरो जीप बक्षीस असलेल्या दुसऱ्या नंबरात बसला. त्यामुळे त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांनी आ. शेळके यांना खांद्यावर उचलून घेत बैलगाडा घाटातच त्यांची जंगी मिरवणूक काल काढली. भाजपच्या घाटात हा राष्ट्रवादीचा जलवा असला, तरी राजकारणापालिकडे जाऊन मी त्याकडे पाहतो, अशी संयमी आणि बैलगाडा मालकाला शोभणारी राजकारणविरहित प्रतिक्रिया आ. शेळकेंनी या बक्षीसावर सरकारनामाशी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या अस्मितेच्या प्रश्न असल्याने बैलांच्या या खेळात सहभागी झालो, असेही ते म्हणाले.

तर गाडामालक, गाडाशौकीन म्हणून या शर्यतीत सहभागी झालो. ती कोणी भरवली हा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तेथे राजकारण येत नाही, अशी आ. शेळकेंसारखी भूमिका वारिंगे मांडली. पहिल्या नंबरात पाच गाडे बसले. त्यातील आंबेठाण, चाकणचे सरपंच संतोष मांडेकर यांच्या बैलगाड्यालाही मावळातील बैल जुंपलेले होते, असे सांगण्यात आले.

दरम्यान, या शर्यतीला प्रचंड प्रतिसाद लाभला. हजारो शौकीनांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांना टोप्या, छत्र्या आणि थंड पाण्याच्या बाटल्याही पुरविण्यात आल्या. पाच दिवसांत बाराशे बैलगाडे धावले. प्रत्यक्षात नोंदणी दोन हजार गाड्यांची झाली होती. जेसीबी, बोलेरो, दोन ट्रॅक्टर, दोन बुलेट आणि ८० लाखांच्या ११४ बाईक अशी दीड कोटी रुपयांची बक्षिसे या शर्यतीसाठी होती. बक्षीसासह दोन कोटी रुपये खर्च या सर्वात मोठ्या शर्यतीवर झाल्याचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in