भाजप नगरसेवकाच्या तक्रारीची तड लावली राष्ट्रवादीच्या आमदाराने

आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी लोणावळा नगरपरिषदेतील भ्रष्ट्राचारावर विधानसभेत लक्षवेधी मांडली.
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama

पिंपरी : मावळचे (जि.पुणे) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आपल्या मतदारसंघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेनंतर आता लोणावळा (Lonavla) नगरपरिषदेतीलही भ्रष्टाचार राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (ता.१६) लक्षवेधीव्दारे मांडला. तळेगाव दाभाडेप्रमाणे लोणावळा नगरपरिषदेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी व ठेकेदाराविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यामुळे लोणावळा नगरपरिषदेतील ११ वर्षापूर्वीच्या या घोटाळ्यात तेथील नगराध्यक्ष, ठेकेदार आणि मुख्याधिकारी आता अडचणीत आले आहेत.

सात दिवसांत शेळके यांची विधानसभेत लागलेली ही दुसरी लक्षवेधी आहे. १० तारखेला तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक तलावातील बेकायदेशीर उत्खननप्रकरणी त्यांची पहिली लक्षवेधी लागली होती. त्याव्दारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांची चौकशी लागली आहे. तर, आजच्या त्यांच्या दुसऱ्या लक्षवेधीने लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, ठेकेदार आणि मुख्याधिकारी अडचणीत आले आहेत.

Sunil Shelke
बिबट्या सफारी : अजितदादांच्या घोषणेविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट भूमिका

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या काही ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांच्या बोगस एफडीआर सादर करून महापालिकेची जशी फसवणूक केली. तशीच भुमिगत गटाराचे काम घेतलेल्या ठेकेदाराने लोणावळा नगरपरिषदेला बनावट एफडीआरव्दारे गंडा घातला आहे. दरम्यान, मावळचे शेळके यांच्या सात दिवसांत दोन लक्षवेधी लागल्या असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये तीन आमदार असूनही त्यांची एकही लक्षवेधी, तारांकिंत प्रश्न अद्याप पटलावर आलेला नाही. त्यामुळे आपल्या आमदारांची लक्षवेधी कधी लागते याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे आता लक्ष लागले आहे.

दोन्ही लक्षवेधींच्या वेळी लेखी उत्तराने शेळकेंचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपप्रश्न विचारून मंत्र्यांकडून विशिष्ट कालावधीत कारवाईचे आश्वासन दोन्ही वेळी घेतले. दोन्ही लक्षवेधी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विभागाशी सबंधित असल्यानने त्यांनी उत्तरे दिली. शेळकेंची ताजी लक्षवेधी ही लोणावळ्यातील भूमिगत गटाराच्या २१ कोटीच्या कामासंदर्भात होती. त्यासाठी ठेकेदाराला आगाऊ रक्कम दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून कार्यवाही करणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेने भूमिगत गटारीसाठी ठेकेदाराला दीड कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिल्याचे प्रकरण गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून महिनाभरात अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगत त्यांनी नगराध्यक्षांच्याही चौकशीचे स्पष्ट संकेत दिले. तर, बोगस एफडीआर दिल्याप्रकरणी ठेकदारावर अगोदरच गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Sunil Shelke
'काश्मीर फाईल्स' वर अजितदादांची रोखठोक भूमिका : भाजपचा दबाव धुडकावला

लोणावळा नगरपरिषदेतील भाजप (BJP) नगरसेवकाने भूमिगत गटार गैरव्यवहाराबाबत तक्रार दिली होती. मात्र, त्याची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ती शेळकेंना दिली. त्यांनी हा घोटाळा लक्षवेधीव्दारे उपस्थित केल्याने त्यावर आता कार्यवाही सुरु होणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या सहीने ठेकेदाराला (सुनील फार्मा इंजिनिअरींग) दीड कोटी रुपये आगाऊ देण्यात आले. या दोषाबद्दल त्यांच्यावर कारवाई न करता नगर अभियंत्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखल्याबद्दल शेळके यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. तसेच नगराध्यक्ष, ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाईची तसेच फौजदारी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यावर नगराध्यक्षांविरुद्ध इतरही तक्रारी आल्या असल्याचे सांगत तीन महिन्यात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री तनपुरे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com