
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी उसाच्या थकीत रास्त व किफायतशीर रकमेबाबत (FRP) मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी मागणी अवास्तव असल्याचे सांगत धुडकावून लावली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यावर मौन राखत साखर आयुक्तांच्या निर्णयाला समर्थन दिले. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचा १०० टक्के एफआरपी द्यावाच लागणार आहे. याशिवाय आगामी गाळप हंगामातही ऊस गाळपाचा परवाना मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (२ ऑगस्ट) पुणे विभाग म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत साखर आयुक्त गायकवाड यांनी थेट कायदाच सांगितल्याने आयुक्त गायकवाड सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. एफआरपी थकीत असली, तरी ऊस जास्त असल्याने येणाऱ्या गाळप हंगामात थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांनाही गाळप परवाना देण्यात यावा. थकीत एफआरपी असलेल्यांना गाळप परवाना देता येणार नाही, अशी साखर आयुक्तांची भूमिका आहे. मात्र यात बदल करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती.
आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी साखर आयुक्त गायकवाड यांना याबाबत विचारले असता, कायद्यानुसार पंधरा दिवसांत उसाची एफआरपी देणे बंधनकारक आहे. थकीत एफआरपी असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी लागेल, नाहीतर शेतकऱ्यांना वेळेत उसाचे पैसे मिळणार नाहीत, असे स्पष्टीकरण साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले. त्यानंतर साखर आयुक्तांनी कायद्यावरच बोट ठेवल्याने मुख्यमंत्र्यांनीही शांत राहत पुढील विषयाकडे वळाले.
संपलेल्या गाळप हंगामात ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, नगरचे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. या सातपैकी तीन राष्ट्रवादी, तीन भाजपचे, तर एक कारखाना काँग्रेसच्या नेत्याचा आहे. त्याचबरोबर एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांना आगामी गाळप हंगामात ऊस गाळप परवाना न देण्याची कडक भूमिका साखर आयुक्त गायकवाड यांनी घेतली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.