
पिंपरी : ग्रामीण भागात अनेकदा वीजवाहक तारांवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे प्रकार समोर येतात. परंतू, शहरातही तसा प्रकार केला जात आहे, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण, ती वस्तुस्थिती पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही गावासारख्याच वीजेच्या ओव्हरहेड तारा असल्याने ही आकडे टाकून चोरी केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील आनंदनगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर ती केली जात असल्याने 'महावितरण'ने काल व आज केलेल्या धडक कारवाईतून दिसून आले.
वीजबील न भरल्याने वीजमीटर काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही तेथे वीजचोरी होत असल्याचे आढळले. तेथे चौदाशे घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आल्या. महावितरणच्या अभियंता कृतिका भोसले व १७ सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.
त्याबद्दल भोसले व सहकाऱ्यांचे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी कौतुक केले. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनी सहकार्य केले.
वीजचोरी विरोधातील या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. ही झोपडपट्टी कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने तसेच नुकताच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर हल्ला झाल्याने या कारवाईच्या वेळी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रिघ लागली आहे. या ठिकाणी वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार आहे.
नादुरुस्त झालेल्या आनंदनगरमधील रोहित्राच्या पाहणीत ही वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. त्यावर लगेचच टाकलेले आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी तेथे नवीन रोहीत्र बसविण्यात आले. ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले. या झोप़डपट्टीत रोहित्रावर लोड येत असल्याने त्यात बिघाड होत आहे.
त्याच्या क्षमतेच्या कितीतरी अधिक तेथे वीजजोड घेण्यात आले आहेत. त्यात अनेक अनधिकृत आहेत. तर अनेक अधिकृत वीजजोडधारक हे बिलाचा नियमित भरणा करीत नसल्याने त्यांचे वीजजोड खंडित करण्यात आले होते. त्यामुळे गेले काही दिवस हा भाग अंधारात होता.
त्यात रोहित्रही नादुरुस्त झाल्याने संपूर्ण झोप़़डपट्टी काळोखात बुडाली. त्यामुळे तेथील रहिवाशांनी व त्यातही महिला या स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयावर धडकल्या होत्या. त्यावेळी त्यांना वीजबील भरण्याचा सल्ला आमदारांनी दिला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.