जयंत पाटलांमुळेच राज्यात कोरोना वाढला : मुळीक यांची टीका - in state corona incrise because of jayant patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

जयंत पाटलांमुळेच राज्यात कोरोना वाढला : मुळीक यांची टीका

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

 ज्या विदर्भातून पाटील यांनी दौऱ्याची सुरवात केली तेथेच कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असल्याची टीका मुळीक यांनी केली आहे.

पुणे : राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचा राज्याचा दौरा नुकताच केला. त्यांच्या सभांमुळेच राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीतक यांनी केला आहे. ज्या विदर्भातून पाटील यांनी दौऱ्याची सुरवात केली तेथेच कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असल्याची टीका मुळीक यांनी केली आहे.

सोमवारी पुण्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.अन्य राजकीय पक्षांचे कार्यकार्ये आणि नेते कोरोनाच्या नियमांचे पदोपदी उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर सरकार कारवाई करीत नसल्याची बाब मुळीक यांनी निदर्शनास आणून दिली.कोरोनाच्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करणे कदापी समर्थनीय नाही, परंतु राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करीत असल्याची टीका मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘‘नाशिक येथे लग्नाला हजेरी लावल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यातलेच एक मंत्री कोविड पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस हेलिकॉप्टरमध्ये साजरा होतो. त्या पाठोपाठ त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या बातम्या आल्यात. त्या आधी त्यांचा राजकीय दौरा राज्यभर सुरु आहे. त्यांच्या सभांची, कार्यक्रमांची सुरुवात विदर्भातून झाली आज तिथेच सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.’’

काँग्रेस पक्ष मुंबईत शक्ती प्रदर्शन करतोय, रॅली काढतोय, पुण्यात राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. डिजिटल युगात कोणीही गोष्ट लपून राहात नाही. केवळ भाजपच्या नेत्यांवर सूड उगवायच्या भावनेने कारवाई करू नये. सर्वांना सारखेच नियम असावेत, अशी भूमिका मुळीक यांनी मांडली.

मुळीक पुढे म्हणाले, ‘‘ कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकांसाठी लोकांच्यात राहून जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. शासनाच्या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही. गृहमंत्र्यांनी जी तत्परता हे गुन्हे नोंदविताना दाखवली तीच पुण्यातल्या आणि राज्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी दाखवली असती तर अधिक बरे झाले असते.’’
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख