शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत, होणार पोलिस चौकशी..

खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक माहिती चुकीची तसेच, गुन्हा दाखल असल्याची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत, होणार पोलिस चौकशी..
Shrirang BarneSarkarnama

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Loksabha Constitituency) शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) अडचणीत आले आहेत.

बारणे यांनी २०१९ च्या लोकसभा आणि २००९ च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक माहिती चुकीची तसेच, त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा व याबाबत प्रलंबित खटल्याची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वडगाव मावळ (ता.मावळ,जि.पुणे) न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल झाली, असून त्याची चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भारत बुऱ्हांडे यांनी सोमवारी (ता.४ ऑक्टोबर) दिला आहे.

Shrirang Barne
पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला घरचा आहेर

निवडणूकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात माहिती खोटी दिली किंवा दडवली, तर सबंधित उमेदवार निवडून आल्यानंतर सुद्धा अडचणीत येतात. तशीच काहीशी अडचण मावळचे शिवसेनेचे खासदार बारणे यांची झाली आहे. त्यांनी २०१९ च्या लोकसभा आणि २००९ ला विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप तक्रारदार अनिल भांगरे (रा.तळेगाव दाभाडे, ता. मावळ) व डॉ अभिषेक हरिदास (रा.कोथरुड,पुणे) यांनी केला आहे.

खासदार बारणे हे पिंपरी-चिंचवड येथील थेरगावात राहतात. म्हणजे ते वडगाव मावळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे क्षेत्र आहे. आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीं विरोधातील अशा प्रकरणात फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १९७३ च्या कलम २०२ नुसार चौकशी अनिवार्य आहे. यामुळे ती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच, तक्रारदारांना याबाबत पुरावे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी (ता.२३ ऑक्टोबर) होणार आहे.

Shrirang Barne
आम्ही शेतकऱ्यांची पोरं; शेतकऱ्यांच्याच बाजूने उभारणार : डॉ. अमोल कोल्हे

संविधान बचावासाठी आपण बारणेच नाही, तर इतरही अनेक लोकप्रतिनिधीं विरोधात अशी न्यायालयात धाव घेतल्याचे तक्रारदार डॉ. हरदास यांनी आज 'सरकारनामाला' सांगितले. या प्रकरणात तक्रारदार भांगरे स्वत:च आपली बाजू मांडत आहेत.

गेल्या २०१९ लोकसभेला बारणे जायंट किलर ठरले होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपले दहावीपर्यंतचे शिक्षण (अनुत्तीर्ण) हे १९८० साली झाल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्या विरुद्ध कुठलाही खटला प्रलंबित नसल्याचा दावाही त्यांनी त्यात केला होता. प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील निगडी पोलिस ठाण्यात २०१३ चा एक गुन्हा दाखल आहे. त्याबाबत पिंपरी न्यायालयात खटला प्रलंबित आहे. ही बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली नसल्याचे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तसेच, २००९ ची विधानसभा निवडणूक चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लढवताना बारणेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली दहावी ही १९८९ ला झाल्याचा उल्लेख केलेला आहे. याकडे तक्रारदारांनी न्यायालयाने लक्ष वेधले. हा मुद्दा पटल्यानेच न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला. म्हणजे एकप्रकारे या तक्रारीत तथ्य असल्याचेच मान्य केले आहे. २०१३ च्या या गुन्ह्यात २०१७ ला दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहे. सध्या हा खटला प्रलंबित आहे. ही बाबही बारणेंनी प्रतिज्ञापत्रात दडवून ठेवल्याची तक्रारदाराची तक्रार आहे. दरम्यान, याबाबत माहिती नाही, एवढीच प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी यावर आज दिली आहे.

Related Stories

No stories found.