शरद पवारांच्या दौऱ्यामुळे अशोक पवारांच्या जिल्हा बॅंकेच्या मार्गातील अडथळे दूर!

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार पवार यांच्यातील शीतयुद्ध शमले आहे.
Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

Sarkarnama

शिरूर : शिरूर आणि आंबेगाव या दोन्ही तालुक्‍यांतील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विशेषतः आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या पथ्यावर पडला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यामुळे बेट भागातील विरोध बऱ्यापैकी संपून गटबाजी शमल्याने आमदार पवारांच्या पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील महत्वाचे अडथळे दूर झाले आहेत. तसेच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) आणि आमदार पवार यांच्यातील शीतयुद्ध शमले आहे. या सोहळ्यानंतर विभागीय अस्मिता जपणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही बऱ्यापैकी मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. (Sharad Pawar's visit removes obstacles in way of Ashok Pawar's Pune District Bank!)

माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या ८० व्या वाढदिवशी बेट भागात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील झाडून सगळा गोतावळा जमला होता. दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष पवार यांच्या हस्ते गावडेंना मानपत्र देऊन गौरविलेल्या या सोहळ्यास गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. खुद्द पवारांसह उपस्थित नेत्यांनी गावडे यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रभावी प्रकाशझोत टाकल्याने गावडे हे शिरूर-आंबेगाव या दोन्ही मतदार संघाचा समतोल साधणारे व दोन्ही तालुक्‍यातील राजकीय स्थिती हाताळणारे नेते असल्यावरही शिक्कामोर्तब झाले.

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

राणेंविरोधातील पोस्टरवरून भाजप आक्रमक : प्रसाद लाडांची पोलिसांत धाव!

शिरूरचे दहा वर्षे आमदार राहिलेले गावडे यांच्या 1995 व 99 च्या निवडणुकांत त्यांचा बालेकिल्ला असलेला बेट भाग ठामपणे त्यांच्या पाठीशी राहिला. पुढे मतदार संघांचे विभाजन झाले आणि गेल्या 12 वर्षांपासून बेट भागासह शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडली, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मर्यादा आल्या. तथापि, मुला-सूनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा जपत त्या भागात वळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीर ताकद उभी केली.

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीपासून काही राजकीय घडामोडींमुळे वळसे-पाटील व आमदार अशोक पवार यांच्यात मतभेदाची ठिणगी पडली. त्या पेटत्या वणव्यात तेल ओतण्याचे काम अनेकांनी केले. मोठे नेते व आपल्या भागाचे प्रतिनिधी म्हणून गावडे यांनी वळसे पाटलांचे नेतृत्व मानताना आमदार पवारांकडे काहीशी पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीसह अनेक छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांच्यात छुपा संघर्षही झाला. तालुक्‍यातील पदाधिकारी निवडीतही विभागीय समतोल साधताना वळसे पाटील-पवार यांच्यात ओढाओढी झाली. दोन्ही भागातील पदाधिकारी-कार्यकर्तेही एकमेकांविरोधात आले.

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

नारायण राणेंनी तिघांना शिंगावर घेत जिंकली बँक..

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदाची संधी न मिळाल्याने मानसिंग पाचुंदकर हे तर थेट आमदारांच्या विरोधात उघड उभे ठाकले. माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनीही तीच री ओढली. त्यातून त्या भागातील फ्लेक्‍स, जाहिरातीतून आमदारांचा फोटो गायब झाला. हे उट्टे भरून काढताना मग शिरूर तालुक्‍यातील आमदार पवारांच्या कार्यकर्त्यांनीही वळसे पाटील यांचे फोटो टाळण्यास सुरुवात केली. त्यातून मतभेदांची दरी वाढत गेली.

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

नारायण राणेंनी रत्नागिरीचा वचपा सिंधुदुर्गात काढला

विधानसभा निवडणुकीत 39 गावांतील मतांची गरज नसली तरी घोडगंगा कारखान्यासह इतर निवडणुकांत तालुका एकसंध असल्याने आमदार पवारांनी आपल्या मूळ स्वभावाला मूरड घालीत त्या भागातील नेते, कार्यकर्त्यांना गोंजारण्यास सुरुवात केली. पण, त्या भागातील विभागीय अस्मिता व स्वाभिमानी बाणा त्यांना कायमचीच डोकेदुखी ठरली. मात्र, गावडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन, तयारीसाठीच्या बैठका, मुख्य सोहळ्यातील संयोजन यानिमित्ताने आमदार पवार आणि त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा एका व्यासपीठावर आले. त्यातून मतभेदाच्या भिंती गळून पडल्या व बऱ्यापैकी मनोमिलन झाल्याने पक्षांतर्गत ताणही हलका झाला.

Sharad Pawar-Ashok Pawar-Popatrao Gawade-Dilip Walse Patil

महाआघाडीवर तोफ डागत फडणवीसांनी केले राणेंचे अभिनंदन

बेट भागातील विरोध बऱ्यापैकी संपल्याने व गटबाजी शमल्याने आमदार अशोक पवार यांच्या पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील महत्वाचे अडथळे दूर झाले आहेत. गावडे यांच्या अभीष्टचिंतनाचा हा सोहळा एका अर्थाने आमदारांच्या पथ्यावर पडला आहे. भविष्यातील पक्षाच्या वाटचालीसाठी हा सोहळा कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरला आहे. गटबाजी कमी झाल्यामुळे 2022 या नव्या वर्षांत येणाऱ्या निवडणुका पक्षाच्या दृष्टीने आणखी सोप्या झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com