सुशीलकुमार शिंदेंसाठी तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले होते : पवारांनी सांगितली ती गोष्ट

शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले.
Sharad Pawar, SushilKumar Shinde
Sharad Pawar, SushilKumar Shindesarkarnama

Sharad Pawar : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस (congress) नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या मैत्रीचे किस्से महाराष्ट्राला परिचित आहेत. राजकारणाच्या पदार्पणावेळी शरद पवार यांनी कशी साथ दिली होती, हे सुशीलकुमार शिंदे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सांगत असतात. आज शरद पवार यांनी आपल्या मित्राचे तोंडभरुन कौतुक केले. महर्षी पुरस्कार सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयीचा एक भावनिक प्रसंग सांगितला.

यावेळी पवार म्हणाले, आज याठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांचा सन्मान केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सार्वजनिक जीवनातील आयुष्य हे अत्यंत संघर्षाचे गेले. एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करते, त्यानंतर ती नोकरी गेल्यानंतर लहान मुले संभाळायचे काम त्यांनी केले. त्यानंतर कोर्टामध्ये लहानसे काम त्यांना मिळाले. शून्यातून सुरुवात केली. कष्टाने शिक्षण घ्यायचे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करायच्या आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे. हे काम त्यांनी केले व आज इथपर्यंत येऊन पोहचले.

Sharad Pawar, SushilKumar Shinde
त्या काळात प्रभू रामचंद्रांवरही टीका झाली होती, केविलवाण्या चेष्टेकडे लक्ष देण्याची गरज नाही !

माझी आणि त्यांची गाठ ते नुकतेच लॉ कॉलेजला आले होते. आमची तिथे भेट झाल्यानंतर एकेदिवशी खाकी ड्रेस चढवलेले शिंदे पाहायला मिळाले. त्यावेळी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहचलो होतो. त्यांची भेट झाल्यापासून माझे त्यांना सारखे सांगणे होते नोकरी सोडून द्या. तुम्ही राजकारणात, समाजकारणात या. तुमचा पिंड समाजातील उपेक्षित माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा आहे. मात्र, त्यांना अडचणी होत्या. नोकरी सोडायची इच्छा होती. पण ती सोडता येत नव्हती. त्यांनी लग्नही आंतरजातीय केले. लग्न केल्यानंतर नोकरी सोडून काही झाले, तरी उगाचच कुटुंबामध्ये प्रश्न निर्माण होतील का याची चिंता त्यांना होती. मात्र, आमच्या भेटीमध्ये मी त्यांना सतत सांगायचो नोकरी सोडण्याचे धाडस करा. एक दिवस त्यांनी हे धाडस केले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, असे पवार यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुका आल्या. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या राखीव मतदारसंघामध्ये त्यांना तिकीट द्यावे हा आमचा प्रयत्न होता. वसंतदादा, विनायकराव पाटील राज्यातील पक्षाचे प्रमुख होते. चव्हाण साहेब पक्षाचे नेते. या सगळ्यांना आम्ही पटवून दिले की एका लहान समाजातील कर्तृत्ववान तरुणाला संधी द्या. महाराष्ट्रातील निर्णय घेणारी कमिटी होती. त्यामध्ये मीसुद्धा सदस्य होतो. तिथे भांडण केले आणि सुशीलकुमार शिंदे यांचे नाव महाराष्ट्रातून मान्य केले. पुढे महाराष्ट्राच्या काँग्रेस कमिटीने त्यांना करमाळ्यातून तिकीट द्यायला केंद्राकडे शिफारस करायचे एकमताने मान्य झाले, असेही पवार म्हणाले.

त्यावेळी पद्धत असायची की, पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सरचिटणीस या दोघांनी राज्यातून ज्या नावांची शिफारस आली ती नावे घेऊन दिल्लीला जायचे आणि केंद्राच्या पार्लमेंट मंडळासमोर ती नावे मांडायची. वसंतदादा आणि मी दोघे दिल्लीला गेलो. त्या मीटिंगला जगजीवन राम, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण असे सगळे दिग्गज होते. त्यामध्ये वसंतदादा आणि त्यांच्या मागे मी होतो. बैठकीला एकेका मतदारसंघाची सुरुवात केली. पहिला मतदारसंघ असायचा तो कुर्ला जवाहरनगर त्यापासून सुरुवात केली आणि बरीचशी नाव मान्य झाली. मग सोलापूर जिल्हा आला आणि त्याची सुरुवात करमाळ्यापासून होते. त्यावेळी मी पटकन सांगितले सुशीलकुमार शिंदे.

त्यावर चव्हाण साहेब आणि आणखी काही लोकांनी मान डोलावली. त्या बैठकीला ज्येष्ठ नेते बाबू जगजीवन राम बसले होते त्यांनी नकार दिला. त्यावेळी तयप्पा हरी सोनवणे नावाचे आमदार होते. ते जगजीवन राम यांचे सहकारी होते. त्यामुळे बाबूजींनी त्यांचे नाव सुचवले. त्यांचे नाव सुचवल्यानंतर त्यांच्यापुढे बोलायची माझी लायकी नव्हती. सगळे मोठे नेते असताना मी त्याठिकाणी चर्चा करायला सुरुवात केली. शिंदेंबद्दल अनेक गोष्टी मांडत असताना मला बाबूजींचा संतापलेला चेहरा दिसला. मला वसंतदादांनी हळूच सांगितले आता बोलू नको, आता काही होणार नाही. आता शिंद्यांचे तिकीट गेले, नोकरी आम्ही सांगितली म्हणून गेली, असे पवार यांनी सांगितले.

मुंबईला विमानतळावर परत आल्यानंतर समोर शिंदे यांना पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण त्यांना नोकरी मी सोडायला लावली होती. बाकी काहीच व्यवस्था नाही. कुटुंब अडचणीत त्यात माझ्या सांगण्यावरून त्यांनी नोकरी सोडली आणि तिकीटही गेले. माझा चेहऱ्या पाहिल्यानंतर या गृहस्थांनी माझीच समजूत काढायला सुरुवात केली. मलाच त्यांनी धीर दिला. सुदैवाने त्यानंतरची निवडणूक झाली तेव्हा मी गृहखात्याचा राज्यमंत्री झालो. ते लॉ पदवीधर होते. त्यांना सांगितले की गृहखात्याच्या मंत्र्यापुढे काही कोर्टाचे अधिकार असतात. काही कोर्टाच्या केस मंत्र्यापुढे असतात.

शिंदे यांचे काय करायचे याची चिंता मला होती. त्यावेळी मी त्यांना काळा कोट घाला व गृहमंत्र्यांच्या समोर येणाऱ्या केस चालवायला सुरुवात करा, असे सांगितले. तेव्हा शिंदेनी केस मांडली की त्यांच्या बाजूने निकाल द्यायचा हे आधीच ठरले. यातून मंत्रालयात सर्वत्र कळाले की तडीपारी घालवायची असेल तर शिंदेंना वकील म्हणून घ्या. यातून त्यांची स्थिती सुधारायची चिन्हे दिसायला लागली. दुर्दैवाने त्यावेळी ज्यांना तिकीट मिळाले तयप्पा हरी सोनवणे वारले. ते गेल्यामुळे तिथे पोटनिवडणूक निघाली. या निवडणुकीसाठी आम्ही थेट चव्हाण साहेबांकडे गेलो आणि मागच्यावेळी झालेला अन्याय दुरुस्त करायचा असे सांगितले. मग इंदिरा गांधींनी त्यांच्या निवडीला मान्यता दिली व शिंदे आमदार झाले.

करमाळा हा त्याकाळी काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ होता. नामदेवराव जगताप म्हणून पक्षाशी प्रमाणिक असलेले नेते होते. त्यांचा हा मतदारसंघ होता. सुशीलकुमार शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढायचे ठरले. त्या मिरवणुकीत शिंदेंच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला नामदेवराव होते. रस्त्याला हजारो लोक होते. हे शिंदेंनी आयुष्यात पाहिले नव्हते. शिंदे यांना नामदेवराव सारखे सांगायचे मतदाराला हात जोडले पाहिजे. यांना हात जोडायचे लक्षात यायचे नाही. तेव्हा ते विसरले की नामदेवराव त्यांना धक्का द्यायचे. अशा पद्धतीने त्यांच्या पहिल्या निवडणुकीची प्रचारफेरी झाली. त्यानंतर ते मोठ्या मताने निवडून आले. केवळ एकदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचा एकदाही पराभव झाला नाही. स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपले स्थान प्रस्थापित केले.

Sharad Pawar, SushilKumar Shinde
Aurangabad : रोज एकमेकांचे वस्त्रहरण करणारे जमले एकाच व्यासपीठावर..

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की निवडणुकीमध्ये काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लगतात. निवडणुकीमध्ये संघर्ष असतो, स्पर्धा असते, यश अपयश असते. मात्र, काही समाजातील घटकांना निवडणुकीमध्ये काही जमेची बाजू असते. मी जर करमाळ्यात निवडणुकीला उभा राहिलो तर समाजातील काही घटकांचा आपोआप फायदा मिळेल. मात्र, त्याठिकाणी लहान समाजातील व्यक्ती निवडणुकीला उभी राहीली तरी तिला माझ्या इतका पाठिंबा मिळेल याची खात्री देता येत नाही. ही कमतरता असते. ती कमतरता शिंदेंकडे होती. मात्र, कर्तृत्वाने त्यांनी आपले स्थान प्रस्थापित केले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि राज्यमंत्री झाले. इथून जो शिंदेसाहेबांचा प्रवास सुरू झाला तर हा गडी थांबलाच नाही, असे पवार यांनी सांगितले.

राज्यमंत्री, त्यानंतर मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, गव्हर्नर झाले, केंद्रीय मंत्री झाले. अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या. नवीन विषयाचा अभ्यास करून त्याची मांडणी सदनात कशी करता येईल याचा आदर्श शिंदे यांनी त्याकाळी केला. मला आनंद आहे आज याठिकाणी त्यांचा सन्मान केला आणि त्यांना पुरस्कार दिला. पुण्याच्या संस्थांचे एक वैशिष्ट्य आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी एखादी गोष्टी योग्य ठिकाणी पोहचवायची ठरवली तर त्याचा सन्मान योग्य ठिकाणी होतो हे मला माहिती आहे याची आठवण त्यांनी ठेवावी, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com