शिक्रापूरचे माजी सरपंच सासवडे यांच्यावर काल खंडणीचा तर आज आपहरणाचा गुन्हा दाखल - Saswade was charged with ransom yesterday and kidnapping today | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्रापूरचे माजी सरपंच सासवडे यांच्यावर काल खंडणीचा तर आज आपहरणाचा गुन्हा दाखल

भरत पचंगे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

शिक्रापूरातील फिर्यादी निघाला बोगस डाॅक्टर 

शिक्रापूर : डॉक्टरला व्यवसाय चालवायला परवानगी म्हणून महिन्याला २५ हजारांची रक्कम मागितल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यासह अन्य तिघांवर फिर्यादी कथित डॉक्टरचे अपहरण केल्याचा गुन्हा नुकताच शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. या डॉक्टरचे रात्री बारा वाजता शिक्रापूरातून अपहरण करुन त्याला पुण्यातील एका हॉटेलात ठेवल्यावर शिक्रापूर पोलिसांनी आज सकाळीच फिर्यादी डॉक्टरसह एका आरोपीला ताब्यात घेतले.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा.माळीमळा शिक्रापूर, मुळ रा.सोईट, पो.धानोरा, ता.उमरखेड, जि.यवतमाळ) यांना दहा दिवसांपूर्वी  माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील म्हणून महिन्याला २५ हजार रुपयांची मागणी केली म्हणून त्यांच्या विरोधात काल (ता.०१) उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

बंडगर याने दिलेली फिर्याद मागे घ्यावी म्हणून त्याचे अपहरण करुन त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी सासवडे यांचेसह त्यांचे बंधून शामबाप्पू सासवडे, सुभाष सांडभोर, गणेश लोखंडे आदी एकुण चौघांवर अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी मयुर वैरागकर यांनी दिली.

बंडगर हे घरी निघाले असताना सुभाष सांडभोर यांनी त्यांना बोलावून घेवून शामबाप्पू सासवडे यांनी त्याला धमकावले व गणेश लोखंडेसह पुण्यातील एका हॉटेलात डांबून ठेवले. सदरची माहिती बंडगर यांनी तपास अधिकारी वैरागकर यांना मेसेज टाकून कळविल्यावरुन वैरागकर व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी वेगवेगळ्या पथकांसमवेत जावून बंडगर यांच्यासह गणेश लोखंडे यांना ताब्यात घेतले. यातील गणेश लोखंडे याला अटक करण्यात आलेली आहे तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती तपास अधिकारी मयुर वैरागकर यांनी दिली.

फिर्यादी बंडगर बोगस डॉक्टर...?

फिर्यादी रामेश्वर विठ्ठलराव बंडगर हा शिक्रापूरात आधार हॉस्पिटल नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार मनसे विद्यार्थीचे पुणे शहराध्यक्ष  कल्पेश यादव यांनी जिल्हा वैद्यकीय अधिका-यांकडे केल्यावर त्याचा तपास होवून त्याचे विरोधात शिक्रापूरात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात बंडगर याला अटक करण्यासाठी त्याची वैद्यकीय प्रमाणपत्रे व्हेरीफाय होणे गरजेचे होते. तालुका वैद्यकीय विभागाने अद्याप बंडगर याची प्रमाणपत्रे व्हेरीफाय केली नसल्याने बंडगर अद्याप बाहेर आहे. मात्र उद्या (ता.०४) या सर्व प्रमाणपत्रांचे व्हेरीफिकेशन झाल्यावर त्यात बोगस प्रमाणपत्रे आढळल्यास बंडगर यालाही अटक होण्याची शक्यता शिक्रापूर पोलिसांनी व्यक्त केली.

या डाॅक्टरच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला आमदार निलेश लंके यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र कल्पेश यादव यांच्या तक्रारीमुळे हा कार्यक्रमच रद्द झाला. सासवडे हे माजी सभापती मंगलदास बांदल यांचे जवळचे नातेवाईक असणे हे या प्रकरणाला राजकीय दिशेने घेवून जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पर्यायाने पुढील काही दिवस या प्रकरणातील रंगत आणखी वाढणार हे नक्की. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख