वाळू माफियांचे पुन्हा थैमान; भरदिवसा केलेल्या गोळीबारात शिरूरमध्ये एक ठार, दुसरा जखमी

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या दिवशीच ही घटना घडल्याने गोळीबारामागे राजकीय कारण होते का, याची आधी शंका होती.
swapni ransingh
swapni ransingh

शिरूर: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाण - घेवाणीवरून आज दुपारी गोळीबाराचा प्रकार घडला. भरदिवसा टाकळीतील एन चौकात घडलेल्या या थरारक घटनेत एकाचा मृत्यु झाला; तर एकजण गंभीर जखमी झाला. 

स्वप्निल छगन रणसिंग (वय २५, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तडीपारी संपल्याने तो पुन्हा टाकळी हाजी गावात आला होता.

दुपारी बाराच्या सुमारास टाकळीतील हॉटेल मळगंगा नजीक तो मित्रांसमवेत गप्पा मारत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्याशी हुज्जत घालून थेट गोळीबार सुरू केला. जीव वाचविण्यासाठी स्वप्निल रणसिंग हा सैरावैरा पळू लागल्यावर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून गोळ्या घातल्या. या थरारक घटनेत त्याला आठ गोळ्या लागल्या. या अंदाधूंद गोळीबारात स्वप्निल सुभाष गावडे (वय २४, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला गोळी चाटून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वाळू धंद्यातील पैशांच्या देवाण - घेवाणीवरून व जून्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून, काही संशयिंतांचे ठावठिकाणे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या थरारानंतर टाकळी हाजी व परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी व परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कुठलीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com