गुन्हेगारांचे कर्दनकाळ डॉ. अभिनव देशमुख बेकायदा व्यावसायिकांचे मोडणार कंबरडे.. - In rural Pune Illegal businesses will close | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्हेगारांचे कर्दनकाळ डॉ. अभिनव देशमुख बेकायदा व्यावसायिकांचे मोडणार कंबरडे..

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे,  डॉ. अभिनव देशमुख दोन दिवसात पुणे जिल्हा (ग्रामीण) अधिक्षक या नात्याने पदभार सांभाळणार आहेत. 

लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे,  कारण अवैध धंदेवाल्याचे कर्दनकाळ समजले जाणारे व "बाते कम काम जादा" वाले डॉ. अभिनव देशमुख दोन दिवसात पुणे जिल्हा (ग्रामीण) अधिक्षक या नात्याने पदभार सांभाळणार आहेत. 

पुणे (ग्रामीण)चे यापुर्वीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी देखील जिल्ह्यात यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. मात्र संदीप पाटील यांनी स्वतःहुन गडचिरोली सारख्या नक्षली भागात काम करण्यासाठी बदली मागून घेतल्याने त्यांच्या जागी आता अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षाच्या काळात अधिक्षक असताना, "माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला तर त्याचं तंगडे मोडले शिवाय राहणार नाही" असं 
जाहीरपणे अवैध धंदे वाले व त्यांच्या बगलबच्च्यांना चार चौघात ठणकावत कोल्हापुरातून डॉ. अभिनव देशमुख यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात बेकायदा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. 

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक पदावर तसेच गडचिरोली पोलीस अधीक्षक पदावर देशमुख यांनी केलेल्या कामाची दाखल घेऊन गृहमंत्रालयाकडून देशमुख यांना नुकतेच आंतरिक सेवा सुरक्षा पदक देखील प्रदान केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या अभिनव देशमुख यांच्या कामाचा दरारा हा पोलिस कर्मचा-यांपासून सर्वच स्तरावरील नागरिकांमध्ये आहे. त्यांच्या कार्यकाळात पुणे ग्रामीण भागातील गुन्हेगारी तसेच अवैध धंद्याना आळा बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे एमबीबीएस आहेत. ते वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत. युपीएससीची परीक्षा दिली आणि ते असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम या पदावर रूजू झाले. त्यानंतर त्यांनी आयपीएसची तयारी सुरू केली आणि ते आयपीएस झाले. ठाणे, एसआरपी ,सातारा व त्यानंतर गडचिरोलीसारख्या नक्षलवादी परिसरात त्यांनी काम केले. नक्षलवाद्यांशी तोंड देताना त्यांनी जे उपद्रवी आहेत त्यांचा खात्मा केला. जे नक्षलवादी सुधारण्यास तयार आहेत, त्यांचे पुनर्वसन याची अतिशय प्रभावी अंमलबजावणी केली.  

नक्षलवादी परिसरात अभिनव देशमुख या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी परिसरातुन थेट कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक झाले. त्यावेळी कोल्हापुरात काळे धंदे जोरात सुरू होते. अभिनव देशमुख हे "बाते कम काम ज्यादा" या पद्धतीने कामास लागले. मी मी म्हणणारे, माझं पोलीस काही करू शकत नाहीत, असं म्हणणाऱ्यांना देशमुख यांनी पोलिसी खाक्या दाखवत कॉलरला धरून कारागृहात घातले. अनेक जण कोल्हापूर सोडून फरार झाले. सकाळी लॉकअपमध्ये जायचे आणि दुपारी जामिनावर सुटायचे अशी सवय असलेल्या अनेकांना दोन-दोन तीन-तीन वर्षे कारागृहात मुक्काम करावा लागला. 

त्यांनी सामान्य माणसाला पोलिस हा तुमचा मित्र आहे, हे छोट्या-छोट्या कृतीतून दाखवून दिले. पोलिस खात्यातही काही हप्ता बहाद्दर होते, त्यांना त्यांनी वेळेत घरी 
बसवले. 2019 च्या महापुरात सलग 20 ते 22 दिवस पाण्यात उभे राहून काम केले. हे करताना आपल्या अधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना आपल्या सोबत कायम घेतले. चांगले 
काम करणाऱ्या पोलिसांना दर महिन्याला जाहीर समारंभात बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याची परंपरा त्यांनी चालू केली. जो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर थाप आणि जो पोलीस दलाची प्रतिमा खराब करतो, त्याला झटका देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. फार न बोलता एखादा अधिकारी किती चांगले काम करू शकतो याचे दर्शन अभिनव देशमुख यांनी त्यांच्या कोल्हापुरातील कारकिर्दीत घडवले. असे देशमुख आत्ता पुण्यात येत आहेत. 

देशमुख यांनी पत्नी सोनाली या डॅाक्टर आहेत. कोरोनाच्या काळात सोनाली यांनी कोल्हापुरमधील सीपीआर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा केली आहे. "मी एसपीची बायको" हा भाव कधीच दाखवलेला नाही, असं हे देशमुख दाम्पत्य कोल्हापुरातून पुण्यात येत आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख