बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; तक्रारींसाठी मंडळानं केली खास व्यवस्था

कोरोना संकटामुळं यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; तक्रारींसाठी मंडळानं केली खास व्यवस्था
Results of Class XII will be announced on Tuesday

पुणे : विद्यार्थी व पालकांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला इयत्ता बारावीचा निकाल अखेर मंगळवारी (दि. 3) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दुपारी चार वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर केला जाईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. दरम्यान, या निकालाबाबत काही तक्रारी किंवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. 

कोरोना संकटामुळं यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंतर्गत मुल्यमापन व मागील वर्गाच्या अंतिम परीक्षेच्या गुणांच्या आधारे इयत्ता दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. बारावीचा निकालही 31 जुलैपूर्वी जाहीर होईल, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांना होती. पण दोन दिवस उलटून गेल्यानंतरही मंडळाकडून तारीख जाहीर होत नसल्याने संभ्रम वाढत चालला होता. अखेर मंडळाकडून सोमवारी सायंकाळी निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. 

दहावीच्या निकालावेळी अनेक वेळ तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. दिवसभर शाळांनाही विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नव्हता. त्यामुळे मंडळाविरोधात विद्यार्थी व पालकांचा रोष वाढला होता. आता बारावीच्या निकालावेळी तांत्रिक अडचणी उद्भवू नये, यासाठी मंडळ सतर्क असेल. तसेच निकालाविषयी विद्यार्थ्यांना काही आक्षेप तक्रारी असल्यास त्यासाठी मंडळाकडून तातडीने मदत मिळणार आहे. 

अशी करता येईल तक्रार?

विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी व त्याचे निराकरण करण्यासाठी मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या अधिकाऱ्यांकडे आपला तक्रार अर्ज टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिश: देता येईल. या अर्जाचा नमूना विभागीय मंडळ स्तरावर तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. हे अधिकारी दहा दिवसांत अर्ज निकाली काढून त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना पत्र किंवा ई-मेलद्वारे कळवतील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली. 

असा लागणार निकाल?

बारावीचा निकाल इयत्ता दहावी, अकरावी व बारावीचे गुण विचारात घेवून तयार करण्यात येणार आहे. दहावी व अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी 30 टक्के गुण आणि बारावीचे 40 टक्के गुण विचारात घेतले जातील. तसेच बारावीतील तोंडी परीक्षांचे गुणही गृहित धरून निकाल जाहीर केला जाईल. 

या लिंकवर पहा निकाल : https://mh-hsc.ac.in/

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.