राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे समाविष्ट गावांची जबबादारी   - Responsibility of new villages in pmc covered by NCP corporators | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे समाविष्ट गावांची जबबादारी  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

२३ गावांतील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे

पुणे : पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने ३० जून रोजी घेतला आहे. या गावांच्या महापालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आले आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. परंतु, महानगरपालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येत आहे.(Responsibility of new villages in pmc covered by NCP corporators) 

२३ गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे,  खासदार वंदनाताई चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेती नगरसेवक २३ गावांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. नव्याने महानगरपालिकेत समावेश झालेल्या या २३ गावांतील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, नागरिकांनी या पदाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास शहराध्यी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे. 
 
अशी आहे गावनिहाय जबाबदारी 
 मांजरी (बु.) – आमदार चेतन तुपे
 वाघोली – आमदार सुनील टिंगरे
 नांदेड – दीपाली धुमाळ
 खडकवासला – सचिन दोडके
 म्हाळुंगे – बाबुराव चांदेरे
 सूस – बाबुराव चांदेरे
 बावधन (बुद्रुक) –  दीपक मानकर
 किरकटवाडी –  सायली वांजळे
 पिसोळी- नंदाताई लोणकर
 कोपरे –  सचिन दोडके
 कोंढवे धावडे – दिलीप बराटे
 नऱ्हे – दत्तात्रय धनकवडे
 होळकरवाडी – गणेश ढोरे
 औताडे-हांडेवाडी – गणेश ढोरे
 वडाचीवाडी – योगेश ससाणे
 शेवाळेवाडी –  वैशाली बनकर
 नांदोशी –  दिलीप बराटे
 सणसनगर –  सचिन दोडके
 मांगडेवाडी - प्रकाश कदम
 भिलारेवाडी – अमृता बाबर  
 गुजर निंबाळकरवाडी –  विशाल तांबे
 जांभूळवाडी - स्मिता कोंढरे 
 कोळेवाडी – युवराज बेलदरे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख