फडणवीसांचा बैलगाडा ठरला फायनलसम्राट; बैलाची किंमत ऐकून विरोधी पक्षनेतेही अवाक्‌!

इंदुरी येथील शर्यतीत रवी शेटे यांचा बैलगाडा विजेता; फडणवीसांच्या नावे सोडलेल्या बैलगाड्यातील एका बैलाची किंमत २५ लाख रुपये
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने ता. १६ डिसेंबर २०२१ रोजी राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील (bullock cart race) बंदी सशर्त उठवली. त्यानंतर मावळ तालुक्यातील नाणोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, तर आंबेगावातील लांडेवाडीत शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या महिन्यात शर्यतीचे आयोजन केले होते. त्यानंतर गेल्या रविवारी (ता. २० मार्च) मावळात इंदुरी येथे बैलगाडा शर्यतींचा पुन्हा धुरळा उडाला. ही शर्यत ज्यांच्यासाठी भरविण्यात आली होती, ते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाने या शर्यतीत बैलगाडा सोडण्यात आला होता. त्यातील एका बैलाची किंमतच २५ लाख रुपये होती, ती ऐकून या शर्यतीचे उदघाटक खुद्द फडणवीसांनीही आश्चर्य व्यक्त केले. (Ravi Shete's bullock cart winner in the race at Induri)

गेल्या महिन्यात मावळातील बैलगाडा शर्यत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केली होती, त्यांचाच त्यावेळी बोलबाला होता. रविवारच्या शर्यतीत तो भाजपचा दिसून आला. कारण, ती मावळचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे आणि भाजपचे माजी सभापती निवृत्ती शेटे यांचे चिरंजीव रवी यांनी भरवली होती. त्यात फडणवीस यांच्या नावे सोडण्यात आलेला शेटे यांचा बैलगाडाच फायनलसम्राट ठरल्याने त्याची चर्चा रंगली. त्याबद्दल या गाड्याला ट्रॅक्टर बक्षीस मिळाला.

Devendra Fadnavis
राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई न करण्याचे निर्देश

देवेंद्र फडणवीस यांनी बंद पडलेली बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री असताना खूप प्रयत्न केले. म्हणून खास त्यांच्यासाठी ही शर्यत भरविण्यात आली होती, असे भाजपचे मावळचे संघटन सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. बैलगाडा शर्यतप्रेमी व भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हेही आवर्जून या वेळी घाटात हजर होते. त्यांचे खंदे समर्थक पिंपरीचे माजी महापौर चिखलीचे राहूल जाधव यांचा बैलगाडा फायनलमध्ये दुसरा आला. त्याबद्दल बुलेटसह रोख बक्षीस या बैलगाड्याने पटकावले.अशारीतीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीत योगायोगाने याच पक्षाचे माजी पदाधिकाऱ्यांचे बैलगाडे विजेते व उपविजेते ठरले. त्याचीही चर्चा तालुक्यात रंगली होती.

Devendra Fadnavis
बारणे म्हणाले, राष्ट्रवादीकडून निधीवाटपात दुजाभाव; राऊत म्हणतात सर्वांना समान न्याय..

दरम्यान, विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही राज्यात सत्ता स्थापन करता न आल्याची खंत फडणवीस यांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात केलेल्या भाषणात पुन्हा दिसली. आपल्या नावे धावलेल्या बैलगाड्याने पहिला नंबर पटकावल्याचा संदर्भ देत त्यांनी जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळे २०१४ आणि २०१९ ला आमचाच बैलगाडा पहिला आला होता. पण, गेल्यावेळी २०१९ ला तीन मार्कशीट जोडून काहींनी पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे सर्वाधिक मार्क मिळवूनही आमचा पहिला नंबर गेला,अशी खंत व्यक्त केली. पण, पुन्हा राज्यात आमचा गाडा पहिला येणार, असा दावाही त्यांनी पुन्हा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com