रमेश थोरातांनी मुलाला पुढे आणले; दौंडमध्ये कुल-थोरातांमध्येच सामना 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात तिसऱ्या घराणेशाहीचा उदय होऊ पाहत आहे. माजी आमदार आणि पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या दुसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.
Ramesh Thorat brought the boy forward; In Daund, the samana is between Kul-Thorat
Ramesh Thorat brought the boy forward; In Daund, the samana is between Kul-Thorat

केडगाव (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात तिसऱ्या घराणेशाहीचा उदय होऊ पाहत आहे. माजी आमदार आणि पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या दुसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. गलांडवाडी (ता. दौंड) येथील कृष्णाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार ऊर्फ गणेश थोरात यांची बिनविरोध निवड झाली. सक्रिय राजकारणात असले तरी तुषार थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिलेच पद आहे. तुषार यांच्या घराण्याची राजकीय पार्श्‍वभूमी पाहता हे पद छोटे असले तरी त्यांची राजकीय वाटचाल ही विधानसभेच्या दृष्टीने चालू झाली आहे. 

सन 1972 पासून 1990 पर्यंत दोन वर्षांचा अपवाद वगळता दौंड तालुक्‍यावर जगदाळे घराण्याची सत्ता होती. 1990 पासून ते आतापर्यंत पाच वर्षांचा कालावधी वगळता तालुक्‍यावर कुल घराण्याची सत्ता आहे. आता तुषार थोरात यांची राजकारणात एन्ट्री झाल्याने थोरात यांच्या घराणेशाहीची चर्चा होऊ लागली आहे. रमेश थोरात यांच्या राजकारणाचा पाया विविध सहकारी सोसायट्यांवर आधारलेला आहे. याच सोसायट्यांमधून तुषार थोरात यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. 

रमेशअप्पा थोरात आणि दिवंगत आमदार सुभाषअण्णा कुल यांच्या जोडगोळीने 1985 पासून दौंड तालुक्‍याच्या राजकारणामध्ये आपला जम बसवण्यास सुरुवात केली. अण्णा-आप्पा ही जोडी सन 1990 नंतर जिल्ह्यात खूपच फेमस झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे तालुक्‍यावरील वर्चस्व या जोडगोळीने 1990 मध्ये मोडीत काढले. त्यानंतर सुभाष कुल यांचं निधन होईपर्यंत कुल-थोरात यांनी एकत्रितपणे कामकाज पाहिले. या दोघांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद दिली. 

आमदार सुभाष कुल यांनी विधानसभा कामकाज पहायचे आणि रमेश थोरात यांनी तालुक्‍यातील सहकार सांभाळायचा, असा अलिखित करार दोघांच्यात झालेला होता. या दोघांमुळे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत झाले. त्यामुळे भीमा-पाटस कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा दूध संघ, जिल्हा बॅंक यावर कुल-थोरात यांनी अबाधित वर्चस्व राखले. सुभाष कुल यांच्या निधनानंतर कुल कुटुंबीय व थोरात यांच्यातील दरी वाढत गेली. कुल यांचे वारसदार म्हणून रंजना कुल राजकारणात पुढे आल्या. त्यानंतर राहुल यांनी राजकारणात प्रवेश केला. 

तुषार थोरात यांनी रमेश थोरात यांच्या 2009, 2014 व 2019 या तीन विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे. सुभाष कुल व रमेश थोरात हे समवयस्क असले तरी 68 वर्षीय थोरात यांनी त्यांच्या मुलाकडे राजकारणाची सुत्रे अद्याप बहाल केलेली नाहीत. रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र गेल्या काही दिवसांपासून तुषार थोरात भावी आमदार अशा पोस्ट सोशल मीडियावरून फिरविल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुल विरुद्ध थोरात अशी पारंपरिक लढत होणार की परंपरा खंडित होणार हे पाहण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. 

आमदार राहुल कुल व रमेश थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे. मात्र, तुषार व राहुल यांच्यात सामंजस्य दिसून येत आहे. एका लग्न समारंभात राहुल यांनी तुषार यांना फेटा बांधला होता, तर कुल यांना कोरोना संसर्ग झाल्यावर तुषार यांनी "दादा लवकर बरे व्हा' अशा शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या होत्या. तुषार व राहुल भविष्यातील राजकीय स्पर्धक असणार आहेत. मात्र त्यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष असू नये अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com