पवारांचा तीन हप्त्यांत ऊसबिलाचा आग्रह : राजू शेट्टी बारामतीत येवून काय बोलणार?

जागर एफआरपीचा, (FRP) आराधना शक्तिपिंठांची, अशी राजू शेट्टी (Raju Shetti) यांची यात्रा सुरू आहे.
पवारांचा तीन हप्त्यांत ऊसबिलाचा आग्रह : राजू शेट्टी बारामतीत येवून काय बोलणार?
Raju ShettySarkarnama

सोमेश्वरनगर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) उद्या (ता. 14) सकाळी यशवंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील थेऊर येथे तर दुपारी तीन वाजता सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जेजुरी येथे येणार आहेत. 'केंद्र व राज्यसरकारला तसेच कारखानदारांना एकरकमी एफआरपीची (FRP) सुबुध्दी सुचू दे' असे साकडे थेऊरच्या चिंतामणीला आणि जेजुरीच्या खंडोबाला घालणार आहेत. यानिमित्ताने 'बारामती' (Baramati) करांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात येऊन शेट्टी राज्यावर की केंद्रावर हल्लाबोल करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

केंद्रसरकारच्या अखत्यारीतील निती आयोगाने उसाची एफआरपी (रास्त व उचित दर) तीन टप्प्यात द्यावी, अशी शिफारस केली होती. त्यानुषंगाने केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाने एफआरपीची साठ टक्के रक्कम चौदा दिवसात, वीस टक्के त्यापुढील महिन्यात तर उरलेली वीस टक्के साखरविक्री झाल्यावर, अशी शिफारस केली होती. त्यावर साखरउत्पादक राज्यांची मते मागविली होती. यावर राज्य सरकारने केंद्रसरकारवर कडी करत साठ टक्के चौदा दिवसात, वीस टक्के हंगाम संपल्यावर आणि उर्वरीत वीस टक्के पुढील हंगामापूर्वी अशी शिफारस करून शेतकऱ्यांना धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तीन टप्प्यांतच रक्कम घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शेट्टी काय यावर भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

Raju Shetty
जयंत पाटलांच्या मुलाने आयफेल टॅावरवर मुलीला प्रपोज केले... हे खुद्द पवारांनी सांगितले

स्वाभीमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना यांनी यास तीव्र विरोध केला आहे. यामुळे राज्यकर्ते विरूध्द शेतकरी संघटना असे चित्र तयार होऊ लागले आहे. यानुषंगाने राजू शेट्टी यांनी पुन्हा आपले जुने उग्र रूप धारण केले असून 'जागर एफआरपीचा आराधना शक्तिपिंठांची' ही यात्रा आयोजित करून राज्यभर शेतकऱ्यांची जागृती सुरू केली आहे. ७ ऑक्टोबर पासून ही यात्रा सुरु आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा या साखरपट्ट्यातील शक्तिपिठांना ते भेटी देत आहेत आणि सभेचे मैदान गाजवून सोडत आहेत. हजारोंच्या संख्येने त्यांना शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे.

दरम्यान, केंद्रसरकारमधील वरीष्ठ मंत्री पियुष गोयल यांनी एफआरपीची रक्कम एकरकमीच द्यावी लागेल, असे लेखी पत्र दिलेले आहे. एफआरपीच्या तुकड्यांचा निर्णयच घेतलेला नाही असेही नमूद करत राजू शेट्टी यांच्या यात्रेतील आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दुसरीकडे निती आयोगाने राज्यांना एफआरपीच्या तुकड्यांबाबत शिफारशीदेखील मागविल्या आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना एफआरपीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झाल्याने शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत.

Raju Shetty
अजित पवारांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्यांचे पुन्हा गंभीर आरोप

शेट्टी हे बंद पडलेल्या यशवंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येऊन राज्यसराकर व कर्जपुरवठादार बँकांवर काय हल्लाबोल करतात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कायम उच्चांकी भाव देणाऱ्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जेजुरीला ते काय बोलतात याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जेजुरीच्या खंडोबाची तीन वाजता आराधना झाल्यानंतर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश भोईटे यांच्या उपस्थितीत शेट्टी यांची जेजुरीनजीक धालेवाडी येथे पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी कोथळे, धालेवाडी येथे विविध उद्घाटने होणार असून स्व. हिराबाई भोईटे स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन व ज्ञानेश्वर भोईटे यांची ग्रंथतुला शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.