
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी (ता.१६) हनुमान जयंतीदिनी पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात हनुमानाची महाआरती केली. मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. हे भोंगे न उतरविल्यास, मशिदीपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
या घोषणेनंतर ठाकरे यांनी पुण्यात हनुमानजयंतीदिनी महाआरती करणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे शनिवारी पुण्यात महाआरतीसाठी दाखल झाले. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या महाआरतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे सामुदायिक पठन करण्यात आले. यानिमित्ताने मनसेने शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, उत्साह, गोंधळ आणि शक्ती प्रदर्शनासाठीची जोरदार घोषणाबाजी असे चित्र यावेळी पहावयास मिळाले.
मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या महाआरतीचे आयोजन केले होते. महाआरतीच्यावेळी ठाकरे यांच्यासमवेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bal Nandgaonkar), अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, मनोज चव्हाण, बाळासाहेब शेडगे, रणजित शिरोळे उपस्थित उपस्थित होते. या महाआरतीमुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या ट्रॅकवर इंजिनला सुरवात केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी भगवी शाल पांघरून ही आरती केली. त्यामुळे मनसेची पुढची दिशा काय असणार, अशी चर्चा पुणे शहरात रंगली आहे.
भाजप (BJP) कडून शनिवारी सकाळपासूनच देशभरात यंदाची हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाजपने हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मनसेनेही याला साद देण्यात आली. पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर हे १५० वर्षे जुने आहे. या मंदिराची भिंत एका अपघातात सुमारे दोन दशकांपूर्वी पडली होती. त्यावेळी हे मंदिर नव्याने बांधताना या मंदिराचे भूमीपूजन राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यामुळे हनुमानाच्या महाआरतीसाठी ठाकरे यांनी मुद्दामहून या मंदिराची निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.