
पुणे : खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या ‘मनी लॉड्रिंग’चा आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली. राऊत यांनी हे आरोप आताच का केले, असा प्रश्न भाजप समर्थकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे कुल यांच्यावरील राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपाच्या टायमिंगची चर्चा दौंडमध्ये रंगली आहे. (Rahul Kul accused of embezzlement of 500 crores; Discussion of Sanjay Raut's 'timing')
आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी भीमा पाटस साखर कारखान्याच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी जनतेच्या पैशाची लूटमार या कारखान्याच्या माध्यमातून केली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला राजकीय संरक्षण मिळणे हे गंभीर आहे. या भ्रष्टाचाराची ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
राऊतांनी आरोप करताच राज्याबरोबरच कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातही त्याचे पडसाद उमटले. कुल यांचे विरोधक आणि कारखान्यासंदर्भात कायम लढणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी ‘भाजप आमदारास भ्रष्टाचार करायचं लायसन्स दिलं आहे का?,’ असा प्रश्न विचारत कुल यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले. पण, संजय राऊत यांनी कुल यांच्यावरच आणि आताच का? आरोप केले, असा प्रश्न कुल समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळासंदर्भात एक विधान केले होते. (राऊत हे विधीमंडळाला चोरमंडळ म्हणाले, असा दावा भाजप आणि शिंदे समर्थककांडून होत आहे. दुसरीकडे राऊत हे ‘चोरमंडळ आपण शिंदे गटाला उद्देशून म्हणालो,’ असे सांगत आहेत). त्यावरून राज्यात मोठा गदारोळ माजला होता. विधानसभा आणि विधान परिषदेतही सत्ताधारी मंडळींकडून गोंधळ घालण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांच्या मागणीवरून राऊत यांच्यावर हक्कभंगाची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी विधानसभा सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचे अध्यक्षपद हे राहुल कुल यांच्याकडे आहे. या समितीने खासदार राऊत यांना नोटीसही पाठवली आहे, त्याला राऊतांनी अजूनही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे विधीमंडळाच्या हक्कभंगासंदर्भात कारवाईची टांगती तलवार राऊत यांच्या डोक्यावर आहे. तोच धागा पकडून कुल समर्थकांकडून राऊतांवर हल्लाबोल केला जात आहे.
हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यानंतरच आरोप का? : कुल
आमदार राहुल कुल यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते लावताना ‘मी २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतरच हा आरोप का झाला,’ असा सवाल कुल यांनी केला आहे.
हक्कभंग समितीत कोण आहेत आमदार?
राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार (सर्व भाजप), संजय शिरसाट, सदा सरवणकर, आशिष जैस्वाल (शिवसेना शिंदे गट), दिलीप मोहिते, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस), नितीन राऊत, सुनील केदार (काँग्रेस), विनय कोरे (जनसुराज्य) या आमदारांचा हक्कभंग समितीमध्ये समोवश आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.