Pune Rain : पाच तालुके वगळता जिल्ह्यात शाळांना तीन दिवस सुटी, पर्यटनस्थळी जमावबंदी

Pune Rain : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाची सावधगिरी
Rain updates in Pune
Rain updates in Punesarkarnama

पुणे,दि. १३: प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळांना गुरूवारची एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

PMC Order
PMC Ordersarkarnama

पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वाच खाजगी कंपनी आणि आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने उद्या आणि परवा पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर, मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला, वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट, जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे) या ठिकाणी असलेले किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

या ठिकाणी वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेत व अपघाताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फौजदारी दंड संहितेचे कलम १४४ लागू करण्यासंदर्भात वन विभागानेही शिफारस केली आहे.

असे असतील प्रतिबंध

पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे या बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे, ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे यासही प्रतिबंध राहील. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई जाहीर करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यात सहा तासात तब्बल ४५ मिलिमीटर पाऊस

पुणे ः बुधवारी (ता. १३) सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने यंदाच्या मोसमातील विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रथमच सलग सहा तासांमध्ये जवळपास ४५ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच यावेळेत शहर व परिसरात सरासरी ४५ मिलिमीटर पाऊस कोसळला. हेच पर्जन्यमान जर पहाटेपासून मोजले तर सरासरी ७० मिलिमीटर अर्थात तब्बल ७ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in