
पुणे : महापालिकेत माननीयांची सत्ता असताना जे शक्य नव्हते ते प्रशासक म्हणून काम करताना पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी करून दाखविले आहे. पुण्यात म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान डीपी रस्त्यालगतच्या तब्बल दीड किलोमीटर परिसरातील हॉटेल, मंगलकार्यालय, गॅरेज तसेच इतर अनधिकृत बांधकामे बुलडोझरने जमीनदोस्त केली.दिवसभरात तब्बल 70 हून अधिक अतिक्रणांवर कारवाई करून तब्बल अडीच लाख चौरस फूट जागा मोकळी केली.गेल्या काही वर्षातील अनाधिकृत बांधकामांवरील ही मोठी कारवाई आहे. राजकीय दबावामुळे इतकी वर्षे न करता आलेली कारवाई महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आज करून दाखविली आहे.
महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे, फ्रंट व साइड मार्जिनमधील बांधकाम, शेड यावर अतिक्रमण विभाग, बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या कारवाईत व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने लोहगाव परिसरात पथकावर हल्ला देखील झाला. त्यानंतर महापालिकेने ही कारवाई अधिक कडक केली आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर नदी पात्राच्या बाजूने अनेक मंगलकार्यालय आहेत. गेल्या काही वर्षात या रस्त्यावर विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असलेले हॉटेल सुरू झाली. त्यामुळे संध्याकाळनंतर मोठी गर्दी या भागात होते. महापालिकेने यापूर्वी एखाद दुसऱ्या मंगल कार्यालयाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली, पण सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई केली नव्हती. आज महापालिकेने नोटिसा बजावून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.
सकाळी सहा पासून महापालिकेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. साडे सात वाजता कारवाई सुरू होताच या भागातील व्यावसायिकांची धांदल उडाली. कारवाई थांबविण्यासाठी परिसरातील हॉटेल, मंगलकार्यालय चालकांनी राजकीय नेत्यांचा दबाव आणून कारवाई थांबविण्याची मागणी केली, पण प्रशासनाने त्यास न जुमानता कारवाई केली.या कारवाईत २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकरचा वापर केला. जेथे जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे गॅस कटरचा वापर करून आतमध्ये घुसून शेड तोडण्यात आले. आठ पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी कारवाई सुरू झाली. जेसीबने थेट बांधकाम, पत्र्याच्या शेडवर वार केला जात असल्याने हॉटेल, दुकाने, गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.
कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे म्हणाले, ‘‘अतिक्रमण विभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ७३ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील चार हॉटेल व एक मंगलकार्यालयावरील कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उर्वरित सर्वांवर आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. यात तीन पोलिस अधिकारी, २५ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे २०० सेवक, सुरक्षारक्षक ६०, वाहने २५, तसेच २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकर याचा वापर करण्यात आला. आता हे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यात आले आहे, याठिकाणी पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जाईल.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.