
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) शहराध्यक्ष बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलायचा झाल्यास नवा शहराध्यक्ष कोण ? अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
नव्या शहराध्यक्षपदाच्या चर्चेत प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भारतीय जनता पार्टीचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे. शहराध्यक्ष बदललाचा की ठेवायचा या निर्णयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलला जाईल का याबद्दलदेखील दोन मतप्रवाह आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना नवा शहराध्यक्ष निवडला जाईल का याबद्दल एक गट शंका व्यक्त करीत आहे तर दुसऱ्या गटाच्या मतानुसार नव्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालीच महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे.
राजेश पांडे यांची निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून तीन महिन्यापूर्वी निवड झाली. त्यावरून पक्षात चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर पुन्हा राजेश पांडे यांना शहराध्यक्ष केले जाईल का ? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाचे काम सक्षमपणे पार पडले. मात्र, सर्व संमतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा कितपत विचार होईल याबाबत पक्षांमध्ये मतप्रवाह आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची शहरात असलेली प्रतिमा आणि पक्षातील वरिष्ठांकडे असलेला संपर्क पाहता मोहोळ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र, तेदेखील सर्वसंमतीचे उमेदवार होतील, असेही नाही.
मुळात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा शहराध्यक्ष बदलला जाईल की नाही याबाबत दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह शहराध्यक्ष बदलून आक्रमक शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवली जाईल असे सांगणारा आहे. दुसरीकडे विद्यमान शहराध्यक्ष शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारा मतप्रवाह आहे. पक्षातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसात शहराध्यक्ष बदलणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल, असे या सूत्रांचे मत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.