आंबिल ओढा परिसरातील कारवाई राष्ट्रवादीचं षडयंत्र; भाजप नेत्याचा घणाघात - Pune BJP slams NCP over encroachment action | Politics Marathi News - Sarkarnama

आंबिल ओढा परिसरातील कारवाई राष्ट्रवादीचं षडयंत्र; भाजप नेत्याचा घणाघात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागल्याचे चित्र आहे. 

पुणे : पुण्याच्या विकासाचे आव्हान पेलण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळंच काही अधिकाऱ्यांना सोबत घेत भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांवर कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणलं. राष्ट्रवादीने पुणेकरांशी कुटील राजकारण थांबवावे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केली आहे. (Pune BJP slams NCP over encroachment action) 

मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनेच ही कारवाई घडवून आणल्याचा आरोप केला. ते म्हणाले, पुढील सहा महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. साम, दाम, दंड, भेद या सर्वप्रकारच्या नीतींचा अवलंब करून निवडणुका जिंकण्याचा राष्ट्रवादीची प्रयत्न आहे. त्यामुळंच ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळं निष्पाप रहिवाशांना बेघर व्हावं लागलं. आता हे नागरिक आघाडी सरकारला पुढील निवडणुकीत रस्त्यावर आणतील.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्लाबोल...भ्रष्टाचारी, जैन हवाला प्रकरणात त्यांचं नाव!

पुणेकरांमध्ये याचा राग असून त्याचे प्रत्यंतर आज आले. प्रशासनाशी चर्चा करायला चला, ही खासदार सुप्रिया सुळे यांची विनवणी आंबिल ओढा कारवाईसाठी आंदोलन करणाऱ्या पुणेकरांनी धुडकावल्याची टीकाही मुळीक यांनी केली. राष्ट्रवादी आघाडीला पंधरा वर्षात करता आला नाही एवढा विकास चार वर्षांच्या काळात झाला आहे. वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या योजना या काळात गतीमान झाल्या, असं मुळीक म्हणाले.

भाजपने शहराचा विकास करून पुणेकरांचा विश्वास मिळवला आहे. विकासकामांचे आव्हान पेलण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये क्षमता नाही. त्यामुळेच भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठी आंबिल ओढा येथे राष्ट्रवादीने कारवाई घडवून आणली. राष्ट्रवादीचा हा कुटील डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही मुळीक यांनी दिला आहे. 

दरम्यान, आंबिल ओढा येथील वसाहतीत झालेल्या अतिक्रमण कारवाईनंतर तेथील नागरिक आक्रमक झाले आहेत. तसेच यावरून राजकारणही तापलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने ही कारवाई केल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादीनेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारवाई घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागल्याचे चित्र आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख