संपलेली टर्म अन् तिसऱ्या लाटेतही नगरसेवक थंड हवेच्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर

Pune and Pimpri chinchwad : दोन्ही पालिकांतील सत्ताधारी भाजपला अभ्यासाची घाई झाली आहे.
bjp ncp shivsena
bjp ncp shivsena

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह (Pimpri chinchwad) पुणे (pune) महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली आहे. विद्यमान नगरसेवकांची टर्म संपण्याच्या मार्गावर असताना आता या दोन्ही पालिकांतील सत्ताधारी भाजपला अभ्यासाची घाई झाली आहे. त्यामुळे त्यांचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची (Corporators) टूरटूर निघाली आहे. पुणे पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक हे गुरुवारीच (ता.६) गुजरातला रवाना झाले. तर, पिंपरीचे या महिन्यात सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोकला जाऊन अभ्यास करणार आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरात कोरोनाची तिसरी लाट जोरदार आली असल्याने ही दोन्ही शहरे त्याची हॉटस्पॉट बनली आहेत. तरीही हे दौरे सुरु झाल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत.

या अगोदरच्या टर्ममध्ये पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची (ncp) सत्ता होती. तेव्हाही त्यांचे नगरसेवक सिक्कीमचा अभ्यास दौरा करून आले होते. प्रत्यक्षात तो पिंपरी-चिंचवडकरांच्या दृ्ष्टीने निरुपयोगीच ठरला होता. त्याचा काहीच रिझल्ट न आल्याने ती त्यांची सहल म्हणजे ट्रीपच झाली होती. त्याची पुनरावृत्ती आता भाजप (bjp) करणार आहे. सिक्कीम, दार्जिलिंग आणि गंगटोक या थंड हवेच्या व पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे पदाधिकारी, नगरसेवक काय आणि कुठला अभ्यास करणार आहेत, याची खुमासदार चर्चा कालपासून पालिकेत सुरु झाली आहे.

विषेश म्हणजे हा दौरा आयोजित केला आहे, कितीजण जाणार आहेत, किती खर्च येणार आहे, याचा तपशील स्थायी समितीसमोर त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करताना खूबीने देणे टाळण्यात आला आहे. तसेच ऐनवेळी तो सादर करून मंजूर करण्याची चलाखी सुद्धा केली गेली आहे. त्याला तोंडदेखला सुद्धा विरोधी पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना (shivsena) सदस्यांनी स्थायीत केला नाही. कोरोना प्रचंड वेगाने वाढत असताना करदात्यांच्या लाखो रुपयांची नाहक उधळपट्टी होणाऱ्या पुणे पालिकेच्या गुजरात दौऱ्याला विरोधी राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष तथा आपनेही विरोध करीत तो रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, तो धुडकावून अभ्यासासाठी भाजप पदाधिकारी, नगरसेवक व इतर काल रवाना झाले.

पिंपरीत तर विरोधी पक्ष राष्ट्रवादीने सिक्कीमच्या दौऱ्याला विरोधच केला नाही. त्यांचे दोन सदस्य व शिवसेनेचा एक सदस्य असलेल्या स्थायी समितीत गुरुवारी (ता.६) ऐनवेळी हा विषय मंजूर केला गेला. गेल्या पाच वर्षात देश, विदेशात झालेल्या पिंपरी पालिकेच्या अशा दौऱ्यांचा काहीही लाभ सर्वसामान्यांच्या दृष्टीने झालेला नाही. त्यामुळे हे अभ्यास दौरे म्हणजे फक्त सहली होत आहेत. त्यातही टर्मच्या सुरवातीस वा मध्यास जाऊन हा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही का अशी विचारणा नागरिकही करीत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वायफळ सरकारी खर्च टाळून सर्व संसाधने ही कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरली गेली पाहिजेत, असे आपचे प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे यांचे म्हणणे होते व आहे. कार्यकाळ संपायला अवघा महिनाभर राहिला असताना, कोरोनाची तिसरी लाट असताना असे दौरे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. म्हणून तो रद्द करावा, लेखी लेखी मागणी त्यांनी केली होती. पुणे मनपाच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी मनपाच्या amenity spaces, flats विकायला काढली असताना लवाजमा घेऊन दौरे आखणे म्हणजे पुणेकर जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी आहे. ते बेजबाबदारपणाचे मोठे उदाहरण आहे, असे ते यासंदर्भात सरकारनामाशी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in