पुण्यात पेट्रोल ९१ रूपये तर डिझल ८० वर पोचले : दर आणखी वाढण्याची शक्यता - price of petrol-diesel is on hike | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात पेट्रोल ९१ रूपये तर डिझल ८० वर पोचले : दर आणखी वाढण्याची शक्यता

उमेश घोंगडे : १४ जानेवारी २०२१
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पेट्रोल-डिझलचे दर वाढण्याचा वेग कमी व्हायला तयार नाही.

पुणे : पेट्रोल -डिझलचे दर वाढण्याचा वेग कमी व्हायला तयार नाही. आज पुण्यात पेट्रोलच्या दरात २४ पैशांनी तर डिझलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली. पेट्रोलचा एक लिटरचा दर ९० रूपये ९९ पैसे झाला आहे. डिझलचा ८० रूपये ०६ पैशावर पोचले आहे. या स्पर्धेत ‘सीएनजी’सुद्धा मागे नाही. ‘सीएनजी’ एका किलोला ५५ रूपये ५० पैशावर पोचले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले क्रूड ऑईलचे दर हे देशांतर्गत बाजारात पेट्रोलचे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. या संदर्भात बोलताना ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, ‘‘इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारापेठेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या बाजारात दरातील चढउतारावर देशातील दर कमी-जास्त होत असतो. दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा (क्रूड) भाव ६० डॉलर प्रतिबॅरल इतका होता. त्याचा परिणाम भारतातील दरांवर झाला.’’

देशातील इंधनाच्या दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम सर्वच व्यापारावर होतो. वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम सर्वच वस्तू महागण्यावर होतो.याचा विशेष फटका हातावर पोट असणाऱ्या कामगारांना बसतो. त्यामुळे ही महगाई रोखण्यासाठी सरकारने इंधनाचे दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी कायम पुढे येत असते. कच्च्या तेलाच्या आंतराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की वर्षातून दोन ते तीन वेळा अशाप्रकारे कच्च्या तेलाच्या भावात मोठ्याप्रमाणात चढउतार होताना दिसतो.त्याचा परिणाम देशातील महागाई कमी-जास्त होण्यावर होतो.यापूर्वीदेखील सुमारे एकदा पेट्रोल ९० रूपयांवर गेले होते. मात्र, त्यानंतर दर कमी होण्यास सुरवात झाली.वारंवार होणारी दरवाढ सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटणारी असते. त्यामुळे सरकारने या दरांवर नियंत्रण ठेवायला हवे, अशी मागणी सातत्याने होत असते. मात्र, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझल स्वस्त द्यायचे म्हटले तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील फरकातील अर्थिक नुकसान केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांना सहन करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे होण्याची शक्यता नाही. दरातील फरक पूर्वी दर पंधरा दिवसांनी बदलण्यास परवानगी होती. मात्र. या काळात कंपन्यांचे होणारे अर्थिक नुकसान विचारात घेऊन हा दर रोजच्या रोज बदलण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझल व सीएनजीचे दर रोजच बदलत असतात. त्यातून सामान्यांची सुटका होण्याची शक्यता नाही.

Edited by : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख