पोलिस आयुक्तांप्रमाणे पिंपरी महापालिका आयुक्तांचीही मुदतपूर्व तडकाफडकी बदली

Pimpri-Chinchwad Politics| राजेश पाटील यांच्या आता महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळांच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे.
Shekhar Singh
Shekhar Singh

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त राजेश पाटील यांची शहराचे दबंग आणि सर्वाधिक फीट आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश तथा के.पी. यांच्याप्रमाणेच आज राज्य सरकारने अचानक मुदतपूर्व बदली केली. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या (MTDC) व्यवस्थापकीय संचालक पदी (MD) म्हणून मुंबईत आज (१६ ऑगस्ट) बदली करण्यात आली.

राजेश पाटील यांची बदलीही के.पीं.सारखी धक्कादायक ठरली आहे. कारण दोघांनीही आपल्या कामाचा ठसा अल्पावधीत पिंपरीत उमटवला होता. तरीही दोघांची दीड वर्षातच उचलबांगडी झाली. या दोघांनाही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत आणले होते. दरम्यान, भाजपने तहकूब ठेवलेले काही शेकडो कोटी रुपयांचे मलईदार विषय आयुक्त पाटील यांनी प्रशासकीय राजवटीत नुकतेच तडकाफडकी मंजूर केल्याची सलही भाजपला बोचत होती. अजित पवार यांना काहीअंशी शह देण्याचा प्रयत्नही आयुक्तांच्या बदलीतून केला गेला आहे.

Shekhar Singh
पुणेच्या धर्तीवर विदर्भात साखर संशोधन केंद्राचे स्वप्न साकार होणार..!

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पाटील यांची बदली अपेक्षित होती. दीड महिन्यापूर्वी राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर १५ दिवसांतच पाटील यांची बदली होणार अशी चर्चा सुरु झाली होती. ती महिन्यातच खरी ठरली. ओरिसा केडरचे २००५ च्या आय़पीएस बॅचचे अधिकारी असलेले पाटील यांना अजित पवार यांनी पिंपरीत आणले होते. मात्र,त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोईची प्रभागरचना आगामी पालिका निवडणुकीसाठी बनवली असा आरोप भाजपने केला होता.

तसेच त्यांच्या काळात आपल्या तीन नगरसेवकांना जेलची हवा खावी लागली. ही सल भाजपला होती. त्या रागातून भाजपच्या महापौरांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांनी भाजपच्या एका नगरसेविकेला तुरुंगात धाडले होते. तर, त्यांच्याच काळात भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाचखोरीत अटक होण्याची मानहानी ओढवली होती. भाजपचेच तिसरे नगरसेवक व माजी उपमहापौरांनाही पाटील यांच्याच काळात फसवणूक व खंडणीच्या गुन्ह्यात जेलची हवा खावी लागली होती. त्यामुळे सत्ताबदल होऊन भाजप राज्यात सत्तेत येताच पाटील यांची बदली होणार हे जवळपास नक्की झाले होते. कारण शहर भाजपने पाटील व अतिरिक्त आय़ुक्त विकास ढाकणे यांच्या कारभाराविरोधात राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या.

Shekhar Singh
भाजप नगरसेवकाच्या तक्रारीची तड लावली राष्ट्रवादीच्या आमदाराने

जिल्हाधिकारी म्हणून सातारा येथून गेल्या महिन्यात बदली झालेले व बदलीच्या प्रतिक्षेत असलेले २०१२ च्या आयएएस बॅचचे शेखर सिंह हे पिंपरीचे नवे महापालिका आयुक्त असतील. त्यांना दिल्लीला प्रतिनियुक्तीवर जायची इच्छा होती. मात्र,त्यांची पुन्हा राज्यातच नेमणूक केली गेली आहे.म्हणजे ते ही समाधानी नसणार.तर,काम करूनही मुदतपूर्व बदली फक्त राज्यातील सत्ताबदलामुळे झाल्याने पाटीलही नाखूष ,यात शंका नाही. पाटील यांच्या बदलीचा आदेश आज शासकीय सुट्टीच्या दिवशी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला.

पाटील यांच्याप्रमाणेच फक्त दीड वर्षातच राज्य सरकारने पिंपरीचे पोलिस आयुक्त केपी हे अमेरिकेत बोस्टन येथे मॅरेथॉन शर्यतीसाठी गेले असताना त्यांचीही अशीच तडकाफडकी बदली यावर्षी २० एप्रिलला केली होती. त्यांच्या जागी नियुक्ती झालेले अंकुश शिंदे यांना तातडीने पदभार घेण्यास सांगण्यात आले होते..त्यामुळे केपींच्या अनुपस्थितीत लगेचच बदलीच्या दुसऱ्या दिवशी (२१ एप्रिल) शिंदे यांनी नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. तसेच आताही शेखरसिंह यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे ते उद्याच पिंपरीत रुजू होण्याची शक्यता आहे.

पाटील व शेखरसिंह यांच्याबरोबर आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या आहेत. त्यात २००३ च्या आएएस बॅचच्या अधिकारी आणि एमटीडीसीच्या एमडी जयश्री भोज आणि २००७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आणि हाफकीन संस्थेचे एमडी मदन नागरगोजे यांचा समावेश आहे.भोज यांची राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे एमडी,तर नागरगोजे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे एमडी म्हणून बदली करण्यात आली आहे. २०१० च्या आयएएस बॅचच्या श्रीमती सुमन चंद्रा यांची नागरगोजे यांच्या जागी नियुक्ती केली गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in