गोवारी हत्याकांडाची जबाबदारीही शरद पवार यांनी दुसऱ्यांवर ढकलावी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मावळ येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीनजण मृत्युमुखी पडले होते.
गोवारी हत्याकांडाची जबाबदारीही शरद पवार यांनी दुसऱ्यांवर ढकलावी
Prasad Lad- Sharad Pawar Sarkarnama

मुंबई : मावळ (Maval) येथे पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर (Farmers) गोळीबार करून त्यांचे बळी घेण्याच्या घटनेची जबाबदारी भाजपवर (BJP) ढकलणारे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेल्या गोवारी हत्याकांडाची जबाबदारीही दुसऱ्यावर ढकलून मोकळे व्हावे, असा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (prasad Lad) यांनी लगावला आहे.

लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येची घटना ही जालियाँवाला बाग हत्याकांडासारखीच आहे, अशी टीका पवार यांनी केली होती. त्यावर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मावळ येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीनजण मृत्युमुखी पडले होते, याची आठवण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली होती. त्यावर पवार यांनी आज प्रतिक्रिया देताना मावळच्या शेतकऱ्यांना स्थानिक भाजप नेत्यांची चिथावणी होती, असे म्हटले होते. त्याला लाड यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे.

Prasad Lad- Sharad Pawar
शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण...

गोवारी हत्याकांड म्हणजे सरळसरळ पोलिसांनी गणवेशात केलेल्या हत्याच होत्या. त्याबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचा राजीनामाही घेतला होता. आता कदाचित यामागेही संघ-भाजप होते, असा शोध पवार लावतीलही. पण त्यांच्या या नव्या संशोधनाने सत्य लपणार नाही. स्वतःच्या राज्यात गोरगरीब-शेतकरी यांच्यावर केलेल्या अत्याचारांचे खापर विरोधकांवर फोडायचे ही पवारनीती जुनीच आहे. या त्यांच्या काव्याला जनता फसणार नाही, असेही लाड यांनी सुनावले आहे.

मावळच्या घटनेमागे भाजपची चिथावणी होती, असा आरोप पवार यांनी केला आहे. मग त्याच न्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जी मोठी आंदोलने होत आहेत, मग ते सीएए कायद्याविरुद्धचे आंदोलन असो वा आता शेतकऱ्यांचे आंदोलन असो, या आंदोलनांना कोणाची फूस आहे, याचे संशोधनही पवार यांनी करावेच, असेही आव्हान लाड यांनी दिले.

मावळ घटनेबाबत आज स्पष्टीकरण देणाऱ्या पवार यांनी गोवारी हत्याकांडाबाबत मौन धारण केले आहे, यातूनच सत्य काय ते उघड झाले आहे, असेही लाड यांनी म्हटले आहे.

मावळ येथील घटनेनंतर तेथे आज काय परिस्थिती आहे ते पहावे, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे. तोच न्याय लावयचा झाल्यास गोवारी हत्याकांड झाल्यावर आज विदर्भात भाजपचे वर्चस्व आहे, या हत्याकांडानंतर 1995 मध्ये व 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले होते, तसेच 2019 मध्येही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला होता, याचीदेखील आठवण पवार यांनी ठेवावी, असाही टोला लाड यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.