तेजोमय भास्कराचे पोस्टर ठाकरेंनी बुजगावण्यासारखे दौऱ्यात फिरवावे

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार मांडणाऱ्या महिलेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हात उगारल्याचा व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे.
bhaskar.jpg
bhaskar.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात चिडलेल्या नागरिकांना लांब ठेवण्यासाठी गुंड, बाऊन्सर, बॉडिगार्ड आपल्याभोवती न ठेवता फक्त तेजःपुंज भास्करच्या चिपळूणनगरीतील पराक्रमाचे पोस्टर छापून ते आपल्यासमोर धरावे. पूरग्रस्त, नाडलेली जनता आपोआप घाबरून पळ काढेल, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई (Shital Gambhir-Desai) यांनी भास्कर जाधव यांना शालजोडीतले लगावले आहेत.(Poster of Tejomay Bhaskara by Thackeray Rotate the tour like a buzz)  

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार मांडणाऱ्या महिलेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हात उगारल्याचा व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे. त्यावर श्रीमती देसाई यांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया देताना जाधव यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. 

भास्कर हे सूर्याचे नाव आहे, सूर्य हा सर्व सृष्टीला जगण्याची उर्जा देतो, पण त्याच्या जास्त जवळ गेले की तो आपल्या किरणोत्साराने सर्वांना भाजून काढतो. त्याचप्रमाणे भास्कर नाव असलेल्या काही व्यक्तीही आपल्या प्रखर तेजाने समोरच्याला भस्म करू शकतात, हे प्रथमच दिसून आले. चिपळूणनगरीतील या तेजस्वी भास्कराच्या पराक्रमाने साऱ्यांचेच डोळे दिपले आहेत. स्त्रीयांचा आदर करणाऱ्या या भास्कराला मुख्यमंत्र्यांनी विशेष पुरस्कार द्यावा, अशी उपरोधिक टीकाही श्रीमती देसाई यांनी केली आहे. 

वास्तविक भास्कराच्या जवळ जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या त्या महिलेचीच सर्व चूक आहे. अगदी भगवदगीतेतील वर्णनाप्रमाणे सहस्त्रसूर्यांचे तेज अंगी असणाऱ्या या भास्करावर डोळे वटारले की असेच होणार, हे त्या महिलेला कळायला हवे होते. चिपळूणनगरीच्या भास्कराला कधीही ग्रहण लागत नाही असे म्हणतात. पण ग्रहणातही भास्कराकडे डोळे वर करून पाहिले तर आपलीच दृष्टि जाते, हे त्या सर्व संपत्ती गमावलेल्या महिलेला कळायला हवे होते, असे शालजोडीतले देखील श्रीमती देसाई यांनी लगावले आहेत. 

यापुढे कोणाही शिवसेना नेत्याला आपत्तीग्रस्त जनतेना दूर पिटाळण्यासाठी हात उगारण्याचीही गरज नाही. फक्त भास्कराच्या या तेजाने भरलेल्या पराक्रमाचे पोस्टर आपल्यासमोर धरले की रयतेला धाक बसेल. जहाल किरणोत्सर्गी किरणांचा वर्षाव असाच रयतेवर करण्याचे काम असेच सुरू ठेवावे हीच या भास्कराला शुभेच्छा, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com