उदय सामंतांनी शॉर्टकट घेतला अन् हल्लेखोरांनी कात्रजच्या चौकात गाठलं... : नेमकं काय घडलं?

Uday Samant | Shivsena | : सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक
 Uday Samant
Uday Samant Sarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर पुणे पोलिस हायअलर्टवर आले आहेत. हल्ला झाल्यानंतर रात्रभर पोलिसांनी अटकसत्र राबवले असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय या हल्ल्याला चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनाही अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. (Uday Samant Attack in pune)

दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्याबाबतीत जिथे घटना घडली, जिथे हल्ला झाला, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या convoy चा रुट नव्हता. उदय सामंत यांची गाडी एकनाथ शिंदे यांच्या convoy च्या मागे राहिली म्हणून त्यांनी शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला आणि ते त्या सभेच्या जवळ पोहचले. नेमकी त्याचवेळी सभा सुटली आणि गाडी यायला एकच वेळ झाली, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही पुणे दौऱ्यावर होते. संध्याकाळी आदित्य ठाकरे यांची कात्रज चौक भागात सभा होती. त्याचवेळी तिथून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानामधून शिंदे आणि सामंत यांचा गाड्यांचा ताफा बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाला. यावेळी सामंत यांचा ताफा कात्रज चौकात सिंग्नलला थांबला असतानाच शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक केली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याची माहिती मिळत आहे.

थोरवेंसह थोरात यांना अटक :

या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांकडून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसंवाद' सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे आणि रुपेश पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. सोबतच १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय सोमवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा 'मातोश्री'वर सन्मान करण्यात येईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करणारे हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनाही अटक करण्यात आळी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in