पुणे महापालिकेच्या मिळकत करात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव - pme praposed incrise in property tax | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे महापालिकेच्या मिळकत करात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

मिळकतकरात केलेल्या ११ टक्के वाढीतून सर्वाधिक २ हजार ३५६ कोटी रूपयांचा महसूळ गृहीत धरण्यात आला आहे.

पुणे : २३ गावांच्या हद्दवाढीनंतर पुणे महापालिका आकाराने राज्यातील सर्वात मोठी महापालिका झाली असून याबरोबरच वार्षिक अंदाजपत्रकातही मोठी वाढ झाली आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आयुक्त झाल्यानंतर आपले पहिले अंदाजपत्रक आज सादर केले. तब्बल ७ हजार ६५० कोटीं रूपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. मिळकतकरात केलेल्या ११ टक्के वाढीतून सर्वाधिक २ हजार ३५६ कोटी रूपयांचा महसूळ गृहीत धरण्यात आला आहे.

पुढच्या अर्थिक वर्षाचा मोठा अंदाज मांडण्यात आला असला तरी चालू अर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यात ३ हजार २८५ कोटी प्रत्यक्षात जमा झाले आहेत. चालू अर्थिक वर्षात ६ हजार २२९ कोटी रूपयांचा अंदाज मांडण्यात आला होता. प्रत्यक्षात पुढच्या दोन महिन्यात चार ते साडेचार हजार कोटींच्यावर महसूल मिळण्याची शक्यता नाही. अंदाजपत्रकात मिळकतराकरावरच भर देण्यात आला असून तब्बल २ हजार ३५६ कोटी रूपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. मिळकत करात ११ टक्के वाढ आयुक्तांनी सुचविली आहे. बांधकाम शुल्कातून ९८० कोटी रूपये गृहीत धरण्यात आले आहेत.

नव्या, जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची नोंद, करातील ११ टक्के वाढ, बांधकाम परवाने, सुविधा क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात निश्‍चितपणे वाढ होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. कुमार म्हणाले, ‘‘ पुणेकरांच्या गरजांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन अंदाजपत्रात योजनांचा समावेश केला आहे. त्या शंभर टक्के अमलात आणल्या जातील. त्यासाठीच्या उत्पन्नवाढीच्या योजनांवर प्रभावीपणे राबविल्या जातील. मूळ हद्दीसह नव्या २३ गावांमुळे वाढलेल्या मिळकतींमुळे करात वाढ होईल. त्यानंतर नव्या सवलतींमुळे बांधकामांचा वेग वाढून ९८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. राज्य सरकारकडूनही ‘जीएसटी’ आणि अन्य स्वरुपाचे अनुदान मिळेल. तीनशे कोटी रुपयांचे कर्जरोखेही घेतली जाणार आहेत.’’

३३२ चौरस किलोमीटर हद्द असलेली महापालिकेची हद्द २३ गावांच्या समावेशामुळे ५१२ चौर किलोमीटर झाली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महापालिका आता राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.

महापालिका वापरणार भाडत्त्वावरील वाहने
‘‘महापालिकेच्या वापरात ५० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येणार असून, या पुढील नवी वाहने महापालिका विकत घेणार नाही. गरजेनुसार भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख