गंभीर गुन्हे सोडून पिंपरी पोलिसांनी पकडला नऊ ग्रॅम गांजा अन् आणि दोन चिलीम...

Pimpri-Police|Krishna Prakash : लुटमार, बलात्कार, विनयभंग, खूनासारखे गंभीर गुन्हे रोखायचे सोडून गांजाडे पकडण्याची क्षुल्लक कारवाई पिंपरी पोलिस करीत असल्याने शहरात खमंग चर्चा सुरू आहे.
 Krishna prakash
Krishna prakashSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) विनयभंग, बलात्कार आदी महिलांविषयक गुन्ह्यांसह खून, लुटमार आदी गंभीर गुन्ह्यांत मोठी वाढ होत चालली आहे. पोलिसांकडूनच दररोज देण्यात येणाऱ्या माहितीतून (पोलिस प्रेसनोट) त्याला दुजोरा मिळतो आहे. या गंभीर गुन्ह्यांना पायबंद घालण्याचे सोडून व ते उघडकीस आणण्याऐवजी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न करणाऱ्या गांजा ओढणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडील दोन-चार ग्राम गांजा व चिलीमा पकडण्याची किरकोळ कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpri-Police) सध्या सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी या मोहिमेत दोन गांजा ओढणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून नऊ ग्राम गांजा, दोन चिलीम असा दोनशे चाळीस रुपयांचा 'मोठ्ठा' ऐवज जप्त करण्याची धडाकेबाज कामगिरी केल्याने तिची चर्चा आहे.

 Krishna prakash
मोठी बातमी : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

अल्पवयीन गुन्हेगारीही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात वाढत चालली आहे. शहरवासियांची ती एक मोठी डोकेदुखी ठरते आहे. १५ वर्षाच्या दोन मुलांनी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर नुकताच (ता.९ एप्रिल) भरदिवसा कोयत्याने खूनी हल्ला केला. मोटारींची नासधूस करण्यासह इतर गुन्ह्यांत या अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग असून तो वाढत चालला आहे. तो तसेच शहरातील वाढती लुटमार, बलात्कार, विनयभंग, खूनासारखे गंभीर गुन्हे रोखायचे व त्यांचा शोध लावण्याचे सोडून गांजाडे पकडण्याची क्षुल्लक कारवाई पोलिस करीत असल्याने त्याची खमंग चर्चा आहे. तसेच ही `दमदार` कारवाई केल्याबद्दल प्रेसनोट काढून पोलिस आपली पाठ थोपटूनही घेत आहे, हे विशेष.

शहरातील भोसरी एमआय़डीसी पोलिस ठाण्याने आपल्या हद्दीत परवा (ता.१२ एप्रिल) एका पडक्या बिल्डींगच्या कठड्यावर गांजा ओढणाऱ्या राजू पुरुषोत्तम गायकवाड (वय ३४, रा. भोसरी एमआय़डीसी) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर जणू काही एखाद्या मोठ्या गुंडाच्या मुसक्या आवळल्याची कामगिरी केल्याच्या थाटात त्याची काल पोलिस प्रेसनोटमध्ये माहिती देण्यात आली. या गांजाड्याकडून पोलिसांनी तीन ग्राम गांजा, चिलीम असा ८० रुपयांचा `मोठ्ठा` ऐवज जप्त केला. दुसरीकडे याच पोलिस बुलेटीनमधील विनयभंगाच्या गुन्ह्यातील आऱोपीला सांगवी पोलिस पकडू शकले नव्हते. तर, दुसऱ्या अशाच गुन्ह्यातील तीनपैकी फक्त एकाच आरोपीला पकडण्यात आळंदी पोलिसांना य़श आले होते. दहा लाखांच्या दोन चोऱ्यातील आरोपींनीही चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. अशाप्रकारे चोरी, घरफोडी, लुटमार यामध्ये चोरीस गेलेला किंमती ऐवज पोलिसांना लगेच सापडत नाही. तसेच ज्यांचा तो चोरीला गेला आहे, त्यांनाही आपली ही आय़ुष्यभराची कमाई परत मिळण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागते आहे.

 Krishna prakash
सुजात आंबेडकरांना सुप्रिया सुळेंसह राज्यातील आणि देशातील 'हे' नेते आवडतात...

चार दिवसांपूर्वी (ता.१० एप्रिल) पिंपरी पोलिसांनी अशीच `मोठ्ठी` कारवाई करीत वडाच्या झाडाखाली पारावर गांजा ओढणाऱ्या विजय गोविंद तांबवडे (वय २२) या तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध `एनडीपीएस` कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. चिलीम व सहा ग्राम गांजा (फक्त अर्धा तोळा) असा एकशे साठ रुपयांचा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. मात्र, त्याच दिवशी भोसरी पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात त्यांना यश आले नव्हते. एका पोलिस हवालदाराच्या शिक्षक पत्नीवर चुकीचे उपचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरलाही ते (वाकड पोलिस) लगेच पकडू शकले नव्हते.

दुसरीकडे गुटखा पकड, मसाज सेंटरवर धाड टाक, गावठी हातभट्यांवर छापा मार अशा कारवाईचा, मात्र त्यांचा धडाका सुरु आहे. त्यासाठी पोलिसांचा वेगळा असा अंमली पदार्थ विरोधी कक्ष तसेच केंद्राचा एनसीबी तथा नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आहे. हातभट्यांचा विषय राज्य अबकारी खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यांनी त्यावर कारवाई करणे अपेक्षित असते. दुसरं म्हणजे शहरात गुन्हेगारी कमी असती, तर ही अशी कारवाई स्थानिक पोलिसांनी म्हणजे पोलिस ठाण्यांनी करण्यास आक्षेप नव्हता. पण, शहरात गुन्हेगारी बोकाळली असताना त्याला पायबंद घालण्याऐवजी अशी किरकोळ कारवाई पोलिस केवळ करीत नसून त्याबद्दल स्वताची पाठही थोपटून घेत असल्याने त्याची खमंग चर्चा ऐकायला मिळते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com