
Pimpri-Chinchwad News : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपण्यास काही संपण्यास अवघे १३ दिवस उरल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेने थकित कर वसुली जोरात सुरु केली आहे. त्यासाठी मिळकती जप्त करण्याच्या जोडीने लाखो रुपये थकबाकी असलेल्यांची नावे त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा धडाका सुरु केला आहे.
या 'डिफॉल्टर'मध्ये काही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आगामी महापालिका निवडणुकीतील इच्छूकही असल्याचे दिसून आले आहे. त्यांची नावे प्रसिद्ध होताच नाईलाजास्तव ते थकित कर भरू लागले आहेत. त्याला पालिकेच्या करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज दुजोरा दिला. या उपायानंतर करवसुली वाढल्याचे त्यांनी सांगितले. एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची नावे प्रसिद्ध केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यानुसार आज थेरगाव करसंकलन कार्यालयाच्या हद्दीतील अशा थकबाकीदारांची पानभर यादी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, त्याअगोदर भोसरीतील हे थकबाकीदार पेपरमध्ये झळकले होते. त्यात बिल्डर, गाववाले, मोबाईल टॉवर कंपन्या अशा दिग्गज असामीही आहेत.
यापूर्वी मोठ्या मिळकतकर थकबाकीदारांच्या घरासमोर पालिकेने बॅण्ड वाजविला होता. यावेळी त्यांची नावे वर्तमानपत्रात झळकवण्याची नवी खेळी त्यांनी केली आहे. यावर्षी साडेनऊशे कोटी रुपयांचा मिळकतकर तथा मालमत्ताकर वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे फेब्रुवारीअखेरपर्यंत तो सातशे कोटी वसूल झाला आहे. म्हणजे एका मार्च महिन्यात तब्बल अडीचशे कोटींची वसूली करायची असल्याने करसंकलन विभाग जोमाने कामाला लागला आहे. थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा देऊन त्या जप्त करीत आहेत, तर काहींचे नळजोड तोडत आहेत. सुट्टीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये सुरु ठेवली गेली आहेत. पाणीपट्टी तीन महिन्यांनी दिली जाते.
मात्र, करसंकलनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तिमाहीत जानेवारी ते मार्च अशी नाही, तर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांसाठीच ती देण्यात आली आहे. तसेच ती भरण्यासाठी 'ड्यू डेट' म्हणजे अवधीही देण्यात आला असून बिलाच्या तारखेच्या दिवशीच ती भरण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे शास्तीकर माफी झाल्याने आता थकित मिळकतकराचा मोठ्या प्रमाणावर भरणा होऊन उद्दिष्टाच्या जवळपास पोचू, आठशे कोटी, तरी कर या महिनाअखेर गोळा करू, असा विश्वास करसंकलन विभागातून व्यक्त करण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.