
पिंपरी : तळेगाव दाभाडे (ता.मावळ) नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.३) झाले.२०११ च्या मावळ गोळीबाराला ते कारणीभूत असल्याने सदर जागा अपवित्र झाल्याचा दावा करीत भाजपने ती गोमूत्र शिंपडून दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.४) तिचे शुद्धीकरण केले होते. ते आता त्यांच्या अंगलट आले आहे. कारण अजितदादांना दोष देत शुक्रवारी शुद्धीकरण करणारी भाजपची हीच मंडळी २०१५ ला तळेगाव नगरपरिषदेच्याच व्यापारी संकुलाच्या भुमीपूजनप्रसंगी अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसली होती. (NCP Latest Marathi News)
२०१५ च्या भुमीपूजनाचे ते फोटो राष्ट्रवादीने दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांत व्हायरल केले. त्यात शुक्रवारी शुद्धीकरण करून राष्ट्रवादीचा निषेध करीत अजित पवारांवर सडकून टीका करणारे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे हे पवारांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसत आहे. तर, हा शुद्धीकरण कार्यक्रम घेणारे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे हे ही त्यावेळी उपस्थित असल्याचे दिसत आाहे. (Pimpri Chinchwad NCP criticizes BJP Leaders)
यातून भाजपचा दुटप्पीपणा समोर आल्याने त्यांच्यावर समाज माध्यमांत सडकून टीका सुरु झाली आहे. २०१५ ला गोमूत्र शिंपडून दादांच्या बाजूला बसले होते का, अशी एक तिखट कमेंट या फोटोंवर आली. तर, पुन्हा तोंडघशी पडले असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, मावळ तालुका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर यांनीही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणाऱ्या भाजपची शनिवारची कृती ही स्टंटबाजी असल्याचे आज सरकारनामाला सांगितले. ती या जुन्या फोटोने त्यांच्याच अंगलट आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा आरएसएसचा एकेकाळचा मावळ हा बालेकिल्ला आता राष्ट्रवादीचा झाल्याचे भाजपचा पोटशूळ उठला आहे. त्यात तेथे आता आमचा आमदार दणदणीत निवडून आला असून त्यांनी अडीच वर्षात काही शेकडो कोटी रुपयांचा निधी आणल्याने शनिवारी हा उद्योग त्यांनी केला. पण, त्यातून त्यांचेच पितळ उघड़े पडले, असा हल्लाबोल खांडभोर यांनी केला.
दरम्यान, २०११ च्या मावळ गोळीबारप्रकरणी अजित पवारांना दोषी धरून त्यांच्या हस्ते भुमीपूजन केलेली नगरपरिषद इमारतीची जागा अपवित्र झाली म्हणून तिचे शुद्धीकरण करणारी तुम्ही मंडळी २०१५ ला का त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला होतात,असे विचारले असता गणेश भेगडे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. २०१५ चा कार्यक्रम शासकीय होता. म्हणून आम्ही व प्रथम नागरिक या नात्याने त्यावेळचे आमदार बाळा भेगडे हे त्यावेळी उपस्थित राहिलो होतो. मात्र, आताचा शुक्रवारचा कार्यक्रम हा शासकीय असूनही तो राष्ट्रवादीने हायजॅक केला. त्यात अजित पवारांचे उदात्तीकरण केले. म्हणून आम्ही गैरहजर राहून त्याचा निषेध केला, असे ते म्हणाले.मात्र, गोमूत्र शिंपडून त्या जागेचे शुध्दीकरण का केले याचे योग्य उत्तर त्यांना देता आले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बंद जलवाहिनीविरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर ९ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला,तर ११ जखमी झाले होते. त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे कारणीभूत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते ३ जून २०२२ रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या इमारतीचे भुमीपूजन झालेली जागा अपवित्र झाल्याचे मानून तिचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले, असे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शनिवारी सांगितले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.