एसीबीनं धाड टाकली अन् स्थायीच्या कायार्लयातील रात्रीची 'ठेकेदारी' थांबली! 

गेल्या बुधवारी (ता.१८) स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचारी हे एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेले.
एसीबीनं धाड टाकली अन् स्थायीच्या कायार्लयातील रात्रीची 'ठेकेदारी' थांबली! 
PCMC Standing Committee Office is closing in time now

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बहूचर्चित धाडीनंतर आता हेच नाही, तर त्याबाजूचे महापौर व विरोधी पक्षनेत्यांचेही कार्यालयही वेळेतच बंद होऊ लागले आहे. त्यातही रात्री उशीरापर्यंत उघडे राहून मोठ्या आर्थिक उलाढाली होणाऱ्या स्थायी समिती कार्यालयाला सायंकाळी साडेसहा वाजताच टाळे लागू लागले आहे. त्यामुळे ही कार्यालय असलेल्या महापालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील वर्दळ मंदावल्याचे दिसून आले आहे. (PCMC Standing Committee Office is closing in time now)

गेल्या बुधवारी (ता.१८) स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचारी हे एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेले. त्याचा धसका पालिका कर्मचाऱ्यांनी एवढा घेतला की आता ते वेळेत तिसऱ्या मजल्यावरील पदाधिकारी कार्यालये बंद करू लागले आहेत. त्यामुळे स्थायी समिती कार्यालयाला, तर काहीशी अवकळा आली आहे. तेथील चार कर्मचारी पकडले गेल्याने ते आज काहीसे ओसाड दिसत होते. तेथील पदाधिकारी, अधिकारी सातच्या आत आता कार्यालय सोडू लागले आहेत. 

त्यामुळे तेथे रात्री उशीरा होणाऱ्या आर्थिक घडामोडींना तूर्त ब्रेक लागला आहे. एरव्ही हे कार्यालय रात्री उशीरापर्यंत उघडे राहत  होते. तेथील विशिष्ट कर्मचारी अगदी मध्यरात्रीपर्यंत थांबून ठेकेदारांशी आर्थिक चर्चा व उलाढाल करीत होते. ती आता थांबली आहे. मात्र, आता ती पालिकेबाहेर व त्यातही पालिकेसमोरील हॉटेलात होण्याची शक्यता वाढली आहे. 

दरम्यान, पालिका मुख्यालयात सर्वाधिक वर्दळ असलेल्या तिसऱ्या मजल्यावर आज (ता.२३) काहीशी सामसूम होती. मुख्य पदाधिकारी आणि शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालयांचे  मुख्य प्रवेशव्दारच सायंकाळी पावणेसात वाजताच बंद करण्यात आले. त्यामुळे मजल्यावर या तीन कार्यालयातील वर्दळही थांबली. एसीबीच्या एका मोठ्या कारवाईने हा चांगला बदल झाल्याचे सांगत तो कायम रहावा, असे मत यावर सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.