धरणग्रस्तांच्या आक्रमकतेमुळे महापौरांनी ऐनवेळी जलपूजन टाळले

खासदार बारणेंनी हे जलपूजन केल्यामुळे महापौरांचा अपमान झाल्याची टीका केली होती. त्यामुळे मावळातील पवना धरणग्रस्त संतापले होते...
धरणग्रस्तांच्या आक्रमकतेमुळे महापौरांनी ऐनवेळी जलपूजन टाळले
pawna dam andolan

पिंपरीः  पिंपरी-चिंचवड (PCMC) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाण्याचे पूजन करण्याचा हक्क हा फक्त महापौरांचाच (Mayor) असल्याचे सांगत त्यांच्या अगोदर ते करणारे मावळचे प्रसिद्धीलोलूप शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी  (MP Shrirang Barne) स्टंटबाजी केली,अशी टीका भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवड पालिकेतील सभागृहनेते नामदेव ढाके यांनी नुकतीच (ता.३१) केली होती. ती सत्ताधारी भाजपच्या आज (ता.४) अंगलट आली.कारण ढाकेंच्या या वादग्रस्त विधानामुळे धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पिंपरीच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी आज हे जलपूजनच केले नाही. ते स्थगित करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.

दरम्यान, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष गेल्या महिन्यात (ता.१८) लाचखोरीत पकडले गेल्यानंतर पंधरवड्यातच भाजप या दुसऱ्या घटनेने पुन्हा काहीसा बॅकफूटवर गेला आहे. दरवर्षी पवना भरले की त्याचे जलपूजन केले जाते. खासदार झाल्यावर बारणे ते गेली सात वर्षे करीत आहेत. यावर्षीही त्यांनी ते ३० ऑगस्टला केले. त्यावरून ढाकेंनी जलपूजनाचा अधिकार महापौरांचा असल्याची हास्यास्पद भूमिका घेत खासदार  बारणेंनी हे जलपूजन केल्यामुळे महापौरांचा अपमान झाल्याची टीका केली होती. त्यामुळे मावळातील पवना धरणग्रस्त संतापले.

पिंपरींच्या महापौरांना मावळतील धरणाच्या जलपूजनाचा अधिकार कोणी दिला? धरणग्रस्तांचे कोणते प्रश्न पालिकेने सोडविले? असा सवाल करत त्यांनी महापौरांच्या जलपूजनाला तीव्र विरोध केला होता. आपल्या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे रवी रसाळ, मुकुंद काळभोर यांच्यासह नागरिक सकाळपासून महापौरांची वाट बघत थांबले. पण,महापौरांनी हा दौराच रद्द केल्याने धरणग्रस्तांनी निषेध सभा घेतली.

पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पालिकेने बाधितांना किती नोक-या दिल्यात हे जाहीर करावे. महापालिकेने धरणातील गाळ काढण्यासाठी किती निधी दिला. धरणग्रस्तांना गाळे किती दिले. या सर्व गोष्टी महापौरांनी जाहीर कराव्यात अशी विचारणा या सभेत करण्यात आली. पवना धरण हे पिंपरी-चिंचवडचे नाही. त्याच्यावर धरणग्रस्तांचा अधिकार आहे. पिंपरी महापालिकेचा नाही. याचे पालिकेतील पदाधिका-यांनी भान ठेऊन विधान करावे, असा सल्लाही धरणग्रस्तांनी यावेळी दिला.

महापौरांना कामासाठी शहराबाहेर जावे लागले असून वातावरण निवळताच त्या जलपूजन करतील, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, ढाकेंचे वक्तव्य आणि भुमिकेला पवना धरणग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. धरण उभारणीसाठी आम्ही मोलाची जमीन दिली. बंदिस्त जलवाहिनी योजनेमुळे मावळच्या तीन शेतक-यांचा बळी गेला. अनेकांना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या. असे असतानाही महापालिकेने धरण परिसरातील शेतक-यांच्या व्यथा कधी जाणून घेतल्या नाहीत.धरणावर पालिकेचा काडीमात्र अधिकार नाही. आमच्या समस्या अजूनही तशाच असताना पिंपरीच्या महापौर जलपुजनाचे नाटक कशासाठी करतात?, त्यांना जलपुजनाचा अधिकार कोणी दिला? नामदेव ढाके यांनी जलपूजनाला यावे. धरणग्रस्तांच्या अडी-अडचणी काय आहेत. हे त्यांना दाखवून देऊ. सत्तेच्या खुर्च्या ऊबवणा-यांनी पिंपरीत बसून तारे तोडू नयेत. अन्यथा जशाच तसे उत्तर द्यावे लागले असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.