पवार म्हणाले; होय रे बाबा मी लस घेतली पण फोटो काढला नाही; असली नौटंकी मला आवडत नाही

अशा फोटोची नौटंकी मला आवडत नाही,
ajit pawar ff
ajit pawar ff

पुणे : कोरोना आढावा बैठकीनंतर बोलत असताना तुम्ही लस घेतली का, असा प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्री अजित पवार यांना विचारला. तेव्हा होय रे बाबा, मी लस घेतली आहे. पण मला इतरांसारखा लस घेतांनाचा फोटो काढायचा नव्हता. त्यामुळे मी लस घेतल्यावर फोटो काढला नाही. अशा फोटोची नौटंकी मला आवडत नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्याबाबत पवार यांची ख्याती आहे. त्यांच्या या स्वभावामुळे राज्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या त्याच बेहमीच्या शैलीत आज दिलेल्या उत्तराने सर्वजण दिलखुलास हसले. पुण्यातल्या कोरोना स्थितीची आढावा त्यांनी आज घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करणार
पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून जिल्ह्यात ६०० लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३१६ केंद्रावर लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांची संख्या दुपटीने वाढवल्यास, या केंद्रांसाठी लागणारी अतिरिक्त लस केंद्र सरकारने पुरवणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आजच्या बैठकीतूनच संपर्क साधण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना निर्मूलन आणि उपाययोजनाबाबतची बैठक झाली. या बैठकीत शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.

दरम्यान, आजपर्यंत सव्वा पाच लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी लस दिली पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.जिल्ह्यात नव्याने आणखी 300 कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पण या केंद्रासाठी केंद्र सरकारने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानंतर लसीकरणासंदर्भातील केंद्राचे प्रभारी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बैठकीतूनच संपर्क साधण्यात आला. जावडेकर यांनी पुणे जिल्ह्याला लस पुरवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्र्वासन जावडेकर यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या सुरु असलेल्या 316 लसीकरण केंद्रावर गेल्या दोन दिवसात प्रतिदिन 30 हजाराहून अधिक नागरिकांना लस दिली जात आहे. काल उच्चांकी ३८ हजार जणांना लस देण्यात आली आहे. लसीचा साठा अपुरा पडत असून तो वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com