सीरममधील आगीची समांतर चौकशी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करणार - paralal enqury of serum incident by pune police | Politics Marathi News - Sarkarnama

सीरममधील आगीची समांतर चौकशी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करणार

उमेश घोंगडे
गुरुवार, 21 जानेवारी 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी भेट देऊन पाहणी करणार आहेत

पुणे : सीरम इन्स्टिटयूटमधील आग नेमकी कशामुळे लागली हे आताच निश्‍चितपणे सांगता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. पवार यांनी रात्री सीरम इन्स्टिटयूटला भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. या घटनेची समांतर चौकशी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करणार आहे.

आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला. या कामगारांच्या कुटुंबियांना सीरमच्यावतीने 25 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या संदर्भात बोलताना पालकमंत्री अजित पवार म्हणाले, "या आगीत मनुष्यहानी झाली ही दु;खदायक आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर येत नाही. चौकशीअंती ते कळेलच. मात्र, यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वच सार्वजनिक संस्थांचे फायर ऑडीट अत्यावश्‍यक असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.''

या घटनेची चौकशी हडपसर पोलीस चौकशी करणार आहे. मात्र, सीरम सारखी महत्वाची संस्था आहे. कोरोनाची लस तयार होत असल्याने साऱ्या जगाचे लक्ष या संस्थेकडे आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना लसीच्या उत्पादनाचे काम सध्या येथे वेगाने सुरू आहे. मोठा अपघात झाला असला तरी कोरोनाची लस ठेवण्यात आली आहे तसेच ज्या इमारतीत या लशीच्या उत्पादन होत आहे. सुदैवाने या इमारतीला आगीची झळ बसलेली नाही.

या घटनेत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. काम करणारे सर्व कामगार ठेकेदाराकडे काम करणारे होते. यामध्ये बिहारमधील एक उत्तर प्रदेशमधील दोन व पुण्यातील दोन अशा पाच जणांचा समावेश आहे, असे सांगण्यात येत आहे.

हडपसरमधील ऍमनोरा सीटीतील फायर ब्रिगेड यंत्रणेचा मोठा उपयोग ही आज विझवण्यासाठी झाला. 25 व्या मजल्यापर्यंत पोचणारी आधुनिक फायर इंजिन असेलेले वाहन ऍमनोरा सीटीकडे आहे. अशाप्रकारचे पुण्यातील हे एकमेव वाहन आहे.

अमॅनोरा सीटीचे उपाध्यक्ष सुनील तरटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीची घटना समजल्यानंतर दुपारी तीन वाजता ऍमनोराची फायर ब्रिगेड यंत्रणा सीरमकडे तातडीने रवाना करण्यात आली. ऍमनोरा सीटीची स्वतंत्र फायर ब्रिगेड यंत्रणा असून त्यांच्याकडे तब्बल 50 लोक या यंत्रणेत काम करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख