एका वकिलाने दुसऱ्या वकिलाचा खून करून प्रेत ताम्हिणीत जाळले - one advocate murders another on land dispute in Tamhini | Politics Marathi News - Sarkarnama

एका वकिलाने दुसऱ्या वकिलाचा खून करून प्रेत ताम्हिणीत जाळले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

एका भूखंडाच्या प्रकाराला वेगळे वळण

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातुन अपहरण झालेल्या ऍड. चंद्रशेखर मोरे यांचा खून करुन मृतदेह जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन रविवारी तिघांना अटक केली. दरम्यान, या खुन प्रकरणामध्ये एका वकीलाचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

कपिल विलास फलके (वय 34, रा. रामदास नगर, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, रा. सालेवाड, आष्टी, बीड) व ऍड.रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, संतनगर, मार्केट यार्ड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोरे हे एक ऑक्‍टोबरला शिवाजीनगर न्यायालयात गेले होते मात्र रात्री साडे नऊ वाजल्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोध घेतल्यानंतर दोन ऑक्‍टोबरला शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले होते. तेथे मोरे यांचा भाऊ प्रशांत यांच्याकडून त्यांचा भाऊ बेपत्ता झाला असल्याची तक्रार घेतली होती. मात्र ऍड.मोरे यांचा घातपात झाला असल्याची शक्‍यता त्यांच्या कुटुंबीयांना वाटत असल्याने त्यांनी ऍड.मोरे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली होती.

याप्रकरणी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह काही राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळानेही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली होती. शेवटी पाच ऑक्‍टोबरला शिवाजीनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरूवात केली. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यावेळी त्यांनी ऍड.मोरे यांना ताम्हिणी घाटात नेऊन तेथे त्यांचा खुन करून मृतदेह जाळला, अशी प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आरोपी ऍड. रोहीत शेंडे हा भूमी अभिलेख व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात वकिली करत होता. तर मृत ऍड.मोरे पर्वती येथील एका भूखंडाच्या प्रकरणात सातबारावरील नावे कमी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. तेथे ऍड. शेंडे याने त्यांना दोन कोटीची लाच मागितली होती. या प्रकरणात ऍड.मोरे यांनी तक्रार केल्यावर ऍड.शेंडेला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले होते. लाच प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी ऍड. मोरे यांना दोघांनी पिस्तूलाच्या धाकाने धमकावले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख