पिंपरी पालिकेतील पदाधिकारी लग्नाला गेले अन् कचरा वर्गीकरणाचे काम पाहून आले

इंदूर शहरातील कचरा विलगीकरणाचा पॅटर्न आता पिंपरी- चिंचवड शहरात राबवला जाणार आहे.
pimpri
pimpri

पिंपरी : देशात स्वच्छतेत अग्रस्थानी असलेल्या मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील कचरा विलगीकरणाचा पॅटर्न आता पिंपरी- चिंचवड शहरात राबवला जाणार आहे. गेल्या आठवड्यात इंदूरला खासगी दौऱ्यावर जाऊन आलेल्या पालिकेतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालिकेत पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी हा निर्णय सार्वजनिक केला.(Officials of Pimpri Municipality went to the wedding and came to see the work of garbage sorting)

ग्रामीण व शहरी असा दुहेरी तोंडावळा असलेल्या उद्योगनगरीत हा इंदूर पॅटर्न कितपत यशस्वी होईल,याविषयी जाणकार, मात्र सांशक आहेत. कारण यापूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळात ओला व सुखा कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीत देण्याकरिता घरटी दोन बकेट (डस्टबिन) देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचा वापर दुसऱ्याच कामासाठी (दळण आदी) केला गेला. तसेच सहा वर्षानंतरही कचरा सध्या एकत्रच टाकला जात असून तो तसाच घेतलाही जात आहे. तर इंदूर शहरात कचरा विलगीकरण हे ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक यानुसार ६ प्रकारे होते.प्रत्येक घरामधून वरीलप्रमाणे वर्गीकरण असल्याशिवाय कचरा स्विकारण्यात येत नाही.

गेल्या आठवड्याची बुधवारची स्थायी समितीची बैठक स्थायीचे अध्यक्ष अॅड.नितीन लांडगे व इतर सदस्य या दौऱ्यावर गेल्याने तहकूब झाली होती. त्यामुळे तो पालिकेचा कचऱ्याचा ठेका घेऊ इच्छिणाऱ्या ठेकेदाराने तो प्रायोजित केल्याची चर्चा झाली. मात्र,आपण एका परिचिताच्या लग्नासाठी इंदूरला आल्याचे अॅड. लांडगे यांनी गेल्या आठवड्यातच इंदूरहून सरकारनामाशी बोलताना सांगितले होते. तर, या दौऱ्यात सहभागी झालेले सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही हा दौरा खासगी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या खासगी दौऱ्याची पत्रकारपरिषद त्यांनी महापालिकेतील आपल्या कार्यालयात घेतल्याने त्याची आज चर्चा झाली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहराचे मानांकन सुधारण्याकरिता महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील ४ वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरलेल्या इंदूरचा हा दौरा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभासद शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अति.आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच सीटीओचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. इंदूरमध्ये कचरा विलगीकरणाचे काम करणाऱ्या मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस आपल्या शहरातील कचरा विलगीकरणाचे काम प्रायोगिक तत्वावर ३  ते ५ वॉर्डमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती ढाके व लांडगे यांनी यावेळी दिली.झोपडपट्टीमुक्त इंदूरमधील ओव्हरफ्लो नसलेल्या  लिटरबिन्स आणि स्वच्छ,सुंदर न तुबलेले ओढे पाहून या पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले.तेथे त्यांना चौकाचौकात,भिंतीवर स्वच्छता व कोरोनाच्या जनजागृतीपर संदेशात कोठेही राजकीय व्यक्तींचे फोटो अथवा नावे दिसून आली नाहीत.

पालिका निवडणूक सात महिन्यावर आल्याने असे काही गोंडस निर्णय घेण्याचा सपाटा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून लावला आहे. कोरोनासाठी जागतिक टेंडर काढण्याची त्यांनी केलेली घोषणाही हवेतच राहिली आहे.तर, कोरोना काळात दुर्बल घटकांना तीन हजार रुपये देण्याची कायद्यात न बसणारी व अंमलबजावणी न होणारी आर्थिक मदतीच्या घोषणेमुळे भाजपने अगोदरच हसे करून घेतले आहे. राज्य सरकारने अशी मदत दिल्याने आयुक्तांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार या सवंग लोकप्रियतेच्या व नियमात न बसणाऱ्या घोषणेला ब्रेक लावला आहे. त्यानंतर कोरोना काळातच तातडीची गरज व आवश्यकता नसलेल्या इंदूर दौऱ्याचेही फलित आतापर्यंत करण्यात आलेल्या अशाच अनेक देश,परदेशातील दौऱ्यासारखे होणार असल्याची चर्चा यामुळे पालिका वर्तुळात ऐकायला मिळाली. लाखो रुपये खर्चून होत असलेल्या या दौऱ्यांचे काहीच फलित आतापर्यंत हाती लागलेले नाही. त्यामुळे हे अभ्यास दौरे फक्त सहल शाबीत झालेले आहेत.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com