ना अजितदादांनी आमदार टिंगरेंचा उल्लेख केला, ना फडणवीसांनी मुळीकांचे नाव घेतले! - not ajitdada gives credit to MLA sunil tingare nor fadnavis to ex Mla Mulik | Politics Marathi News - Sarkarnama

ना अजितदादांनी आमदार टिंगरेंचा उल्लेख केला, ना फडणवीसांनी मुळीकांचे नाव घेतले!

अमोल कविटकर
शनिवार, 2 जानेवारी 2021

भामा आसखेडचा श्रेयवाद अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी टाळला... 

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या भामा आसखेड योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या आधीपासून श्रेयवादाची लढाई रंगली खरी, पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादाच्या लढाईला अनुल्लेखाने टाळले आणि एकमेकांच्या सुरात सूर मिळवला.

वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि भाजप अध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आपल्याच नेत्यांमुळे भामा आसखेड योजना प्रत्यक्षात आली, असे दावे-प्रतिदावे केले होते. त्यावरून वडगाव शेरी मतदारसंघात फ्लेक्सबाजी झाली. तसेच या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीपासून आजी व माजी आमदारांच्या समर्थकांत या योजनेसाठी आपल्याच नेत्याने कसे प्रयत्न हे सांगण्याची स्पर्धा सुरू होती.  मात्र या दोन्ही आजी-माजी आमदारांच्या श्रेयाच्या वादात अजित पवार आणि फडणवीस हे दोघेही पडले नाहीत. 

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण पुणे महापालिकेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. खरे तर या दोन नेत्यांनी एकत्र व्यासपीठावर येण्याचे मान्य केल्यानंतरच या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच श्रेयवादाच्या लढाईबाबत दोन्ही नेते काय भाषणात काय भूमिका घेतात? याचीही उत्सुकताही होती. 

अजित पवार यांनी आपल्या भाषणात या भागातील टॅंकरमाफियांचा उल्लेख करत कोणाला टोमणा मारला, याचीही चर्चा त्यानंतर रंगली. ही योजना मार्गी लागल्याने या टॅंकरमाफियांच्या पोटात दुखत असेल, या अजितदादांच्या वक्तव्याचा रोख अनेकांच्या भुवया उंचावून गेल्या. अजित पवारांनी ही योजना मार्गी लावण्यात खेडचे तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश गोेरे, पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे, खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांचा आवर्जून उल्लेख केला. ज्यांच्या मतदारसंघात या योजनेचे पाणी पोहोचणार आहे व गेले वर्षभर ज्यांनी पाठपुरावा केला ते राष्ट्रवादीचे आमादर सुनील टिंगरेंचे नाव घेण्यास विसरले.  अजितदादांच्या आधी फडणवीस यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्य भाषणात तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी या योजनेसाठी अनेक बैठका घेतल्याचा उल्लेख केला. मात्र या बैठकांत सहभागी असलेले भाजपचे तत्कालीन आमदार मुळीक यांचे नाव घेतले नाही. 

भामा आसखेड पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात येण्यासाठी मोठा कालावधी लागला असल्याने यात आघाडी सरकारसह फडणवीस सरकारचेही योगदान आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र असे असताना भाजपचे आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू होती. वडगाव शेरी मतदारसंघासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे. त्यामुळेच भाजपचे माजी आमदार मुळीक आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार टिंगरे यांचे समर्थक आपल्या नेत्याचे योगदान दुसऱ्या नेत्यापेक्षा किती जास्त आहे, हे सांगत होते.

या श्रेयवादाच्या लढाईच्या शेवटचा अंक कार्यक्रम सुरु असताना सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या जोरदार घोषणा दिल्या. मात्र बाहेर हे चित्र असताना व्यासपीठावरील नेत्यांनी आपल्या भाषणात यावरील टिप्पणी टाळली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख