खंडणीखोर बऱ्हाटेला नऊ दिवसांची पोलीस कोठडी  - Nine days in police custody for ransom seeker Barhate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

खंडणीखोर बऱ्हाटेला नऊ दिवसांची पोलीस कोठडी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

बऱ्हाटेला मदत करणा-यांची होणार चौकशी   

पुणे : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात खंडणीखोर रवींद्र बऱ्हाटे याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.(Nine days in police custody for ransom seeker Barhate)

यापूर्वी अटक करण्यात आलेली बऱ्हाटेची पत्नी संगीता (वय ४९, रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (वय ४९) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुलगा मयुरेश याची ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. बऱ्हाटे याने कायद्याला सामोरे जाण्याचे टाळून फरार कालावधीत माध्यमांद्वारे स्वतःचे उदात्तीकरण करण्याबरोबरच तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, साथीदार, फिर्यादी यांच्यावर टीका-टिप्पणी करून त्यांना दबावाखाली ठेवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केला.

या प्रकरणात सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. बऱ्हाटे हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख आहे. त्याच्या टोळीने केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. चव्हाण यांनी केली. बऱ्हाटेने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून एकूण १२ वेळा वेगवेगळ्या चित्रीकरणाचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप व कागदपत्रे अपलोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला कोथरूड पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर दोन गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाई झाली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख करीत आहेत.

बऱ्हाटेला मदत करणा-यांची होणार चौकशी   
फरार असताना त्याने कोणती गुन्हेगारी कृत्ये केली आहे का ? फरार कालावधीत तो कोठे वास्तव्यास होता. त्याची अटक टाळण्यासाठी त्याला कोणी मदत केली? त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसे, औषधे, वैद्यकीय उपचार, प्रवासाची साधणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक मदत व साहाय्य कोणी व कशा प्रकार केले? ही मदत कोठून पुरविण्यात आली? याचा तपास पोलिस करीत आहेत.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख