अशी ही भाऊबंदकी : आमदार काकाचे करियर उद्ध्वस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव!

कधीकाळी उजवा हात असलेला पुतण्या बनला वैरी...
अशी ही भाऊबंदकी : आमदार काकाचे करियर उद्ध्वस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव!
shailesh-dilip mohite

पुणे : राजकारणातील संंबंध नेहमीच सुरळीत राहतील, असे कधीच घडत नाही. त्याचा प्रत्यय खेड तालुक्यात येत आहे. 2004 ते 2014 पर्यंत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा उजवा हात म्हणून वावरणारे त्यांचे पुतणे शैलेश हेच त्यांचे आता सख्खे वैरी झाले आहेत. चुलत्याने या पुतण्याच्याविरोधात गंभीर तक्रार दिली आहे. शैलेश यांनी आमदार मोहिते यांनाच हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार मोहिते यांचे पुतणे म्हणून ओळख असलेले शैलेश यांनी खेड तालुक्यात 2009 ते 2014 या काळात मोठी भूमिका बजावली. खेडसारख्या औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या तालुक्यात राजकीय विरोधकांनी आमदार मोहिते यांच्याइतकीच शैलेश यांच्यावरही टीका केली. पण या काका-पुतण्यांत काही कारणांमुळे मतभेद निर्णाण झाले आणि ते एकमेकांचे करीयर संपवायला निघालेत की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे.

हे संबंध खराब झाल्यानंतर दिलीप मोहिते हे आता शैलेश हा लांबच्या भावकीतला असल्याचे सांगतात. पण जेव्हा संबंध चांगले होते तेव्हा शैलेश हा आमदाराचा पुतण्या म्हणूनच पोलिस स्टेशन, कंपन्या, राजकीय मंडपात सातत्याने वावरत होता. मोहिते विरोधकांना खच्ची करण्यात शैलेश याचा जास्त वाटा असल्याचे तेव्हा बोलले जात होते. आता या दोघांमधील वितृष्ट इतक्या पातळीवर गेले आहे की काकांनी थेट गुन्हा दाखल करून धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. 

इकडे शैलेशनेही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवत राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती मिळवून काकांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आमदार विरोधातील राष्ट्रवादीतील नेत्यांशी शैलेश यांची उठबस ही तशी लपून राहणारी नव्हतीच. त्यामुळे आपल्या विरोधात आपल्याच पक्षातील काही नेते तर त्याला बळ देत नाहीत ना, अशी शंका आमदार मोहिते यांना होती. पशुवैद्यकीय पदवीधर असलेल्या या पुतण्याने काकाशी घेतलेला पंगा चांगलाच अंगाशी आल्याचे दिसून येत आहे.

दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅप रचणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील राहुल कांडगे हा आमदारांचा विरोधक म्हणून तालुक्यात परिचित आहे. त्यानेच आमदारांना काही गुन्ह्यांत कायदेशीर लढाई करायला लावली होती. त्यामुळे कांडगे आणि दिलीप मोहिते या दोघांतील भांडणे तालुक्याला परिचित आहेत. त्यात आता शैलेशही सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाला पुढे कसे वळण मिळणार, याकडे आता लक्ष आहे. या प्रकरणाची फिर्याद आमदार मोहिते यांच्या जवळचे पुतणे मयूर यांनी दिली आहे. 

नक्की काय घडले?

शैलेश शिवाजी मोहिते-पाटील आणि  राहूल किसन कांडगे यांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आ.दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपये उकळण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला 1 लाख रुपये संशयितांनी दिले होते. मात्र, त्या युवतीनेच याची माहिती आमदारांच्या पुतण्यास फोन करून दिली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने पोलिसांना सांगितले की, शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.12 एप्रिल रोजी साताऱ्यातील फ्लॅटवर भेटण्यासाठी आले होते.  त्यांनी आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तू पुतण्याच्या माध्यमातून आमदार यांच्याकडे नोकरी माग व घसट वाढव. आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ, नंतर आपण त्यांना बदनामीची भीती तसेच पोलीस केसची भीती दाखवू,. यामुळे ते आपल्याला भरपूर पैसे देतील, त्याबद्‌ल्यात तुला जास्त पैसे आणि पुण्यात  फ्लॅट घेऊन देतो. आम्ही तिघांनी पूर्ण प्लॅन केला असून तू फक्त त्यात सहभागी हो, असे सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यां तिघांनी त्याबदल्यात तिला वेळोवेळी एकूण 1 लाख 4 हजार रूपये दिले होते. मात्र, मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचा पुतण्या मयुर यांना फोन करून सदर प्लॅन सांगितला. यानुसार मयूर यांनी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

Related Stories

No stories found.