
Maval Bazar Samiti News : मावळ (जि.पुणे) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक परवा (ता.२४) होत असून ती बिनविरोधच होईल, अशी दाट शक्यता आहे. समितीत महाविकास आघाडीला मिळालेले बहूमत पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सभापती निश्चीतच आहे. फक्त उपसभापती हा दोन जागा मिळालेल्या कॉंग्रेसला मिळते का ही उत्सुकता आहे.
मावळ (Maval) बाजार समितीच्या २८ एप्रिलला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या सहकार पॅनेलने प्रतिस्पर्धी भाजपचे (BJP) माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. खेडला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी विरोधी भाजप, दोन्ही शिवसेना आणि कॉंग्रेस अशा चार पक्षांच्या पॅनेलचा दहा-एक अशा पराभव केला. तर, मावळात राष्ट्रवादीचेच आमदार शेळके यांनी प्रतिस्पर्धी भाजप आणि कॉंग्रेसच्या (Congress) एका गटाच्या पॅनेलला १७-१ अशी धूळ चारली.
या दोन्ही ठिकाणी परवा सभापती, उपसभापतीची निवडणूक होत आहे. खेडला ही दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच असणार आहेत. तर, मावळात सभापतीपद राष्ट्रवादीचा आणि उपसभापती कॉंग्रेसचा होईल, असे संकेत आहेत. फक्त कुठला अनुभवी संचालक सभापती होतो, हे बाकी आहे. ती संधी शेळके कोणाला देणार याची, मात्र उत्सुकता आहे. तर, दोन संचालक निवडून आलेल्या कॉंग्रेसला उपसभापती पद मिळण्याची शक्यता आहे.
मावळ बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. वडगाव येथील मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत ही निवडणूक होणार आहे. तिची प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरु होऊन दीड तासातच पूर्ण होईल. उमेदवारी अर्ज वाटप, स्वीकृती, छाननी आणि माघार या प्रत्येक टप्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी आहे. त्यानंतर आवश्यक असेल, तर मतदान होईल.
मार्केट यार्डच तथा बाजारच नसल्याने मावळ बाजार समितीत एक पै ची उलाढाल नाही. तरीही समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत लाखोंचा खर्च झाला. त्यातून फक्त नाव आणि प्रतिष्ठेसाठी तो केल्याचे दिसून आले आहे. समितीची सात एकर जागा तळेगाव स्टेशन येथे आहे. मात्र, तिच्या चारही बाजूंना खासगी मालकांच्या जमिनी असल्याने तिकडे जायला रस्ताच नाही. परिणामी तेथे बाजार तथा मार्केट यार्ड गेल्या कित्येक वर्षात सुरु करता आलेल नाही. ते येत्या पाच वर्षात सुरु करण्याचे मोठे आणि पहिले आव्हान नवे संचालक मंडळ आणि सभापती, उपसभापती यांच्यासमोर आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.