'पिंपरी-चिंचवडकरांच्या जलआक्रोशाचीही फडणवीसांनी दखल घ्यावी!'

अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर टीका
'पिंपरी-चिंचवडकरांच्या जलआक्रोशाचीही फडणवीसांनी दखल घ्यावी!'
Devendra Fadnavis, Ajit Gavhanesarkarnama

पिंपरी : औरंगाबाद येथील पाणीप्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावरुन फडणवीसांवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने (NCP) त्यांच्यावर हल्लाबोल केला.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा असतानाही गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करणारे फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईची जबाबदारी स्विकारून शहरवासियांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी केली आहे.

भाजपच्या औरंगाबाद जलआक्रोश मोर्चावर त्यांनी जोरदार टीका केली. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्यातील अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. राष्ट्रवादीची पिंपरी पालिकेत सत्ता असताना पाणीटंचाई निर्माण झाली नाही. चांगल्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर अवघ्या दीड वर्षांत शहरावर पाणीटंचाईचे संकट आले. पवना धरण भरलेले असतानाही केवळ निविदा काढणे, भ्रष्टाचार करणे, त्यातून स्वत:ची घरे भरणे यामध्ये गुंतलेल्या भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजविले.

Devendra Fadnavis, Ajit Gavhane
एका महिलेचा मतदारसंघ चोरून आमदार..! पुण्यात चंद्रकांतदादांविरोधात बॅनरबाजी

नियोजनाअभावी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील जनतेवर जलआक्रोश करण्याची वेळ आली. शेकडो कोटींच्या निविदा काढल्यानंतरही भाजपला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता आलेला नाही. हे अपयश भाजपच्या नेत्यांचे नव्हे काय? असाही प्रश्न गव्हाणे यांनी विचारला. 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन फडणवीस यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शहरवासियांना दिले होते. मात्र, ते सत्ताकाळात दिवसातून एकवेळा देखील पाणी देऊ शकले नाहीत. खोटी आश्वासने देणे, भूलथापा मारणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा भाजप नेत्यांचा धंदा असून जनता येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल, असे गव्हाणे म्हणाले.

पिंपरी-चिंचवडकरांना सध्या जो जलआक्रोश करावा लागत आहे, त्याची फडणवीस यांनी दखल घ्यावी. तसेच पिंपरी-चिंचवडकरांना खोटे आश्वासन दिल्याबद्दल जाहीर माफी मागावी. आपल्या सत्ताकाळात ज्या पदाधिकार्यांनी भ्रष्टाचार, लाचखोरी, खंडणीखोरी केली त्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी. ज्या जनतेने अत्यंत विश्वासाने सत्ता तुम्हाला दिली होती त्याचा हिशोब जनतेला देण्याची वेळ आलेली असल्याने नाहक इतर ठिकाणी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने करण्याऐवजी ज्या जनतेचा तुमच्या पदाधिकार्यांनी विश्वासघात केला त्याचे उत्तर अगोदर पिंपरी-चिंचवडकरांना द्यावे, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis, Ajit Gavhane
चंद्रकांतदादा, आम्हीही खूप काही बोलू शकतो; पण... : अजितदादांनी सुनावले

पवना जलवाहिनीचे राजकारण

पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादीकडून पवना जलवाहिनीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, भाजपने याबाबत वेगळी भूमिका घेत या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे शहरवासियांना आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेण्याचे पाप भाजपने केले. दुसरीकडे भामा आसखेडची पाणीयोजना पुण्यात सुरू झाली. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना ती सुरू करण्यात अपयश आले. भ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेल्या भाजप नेत्यांनी निविदा प्रक्रियेत केलेल्या अनागोंदीमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे शहरवासियांवर पाण्याचे दुर्भिक्ष ओढावल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in