विलास लांडेंची अजितदादांकडं तक्रार अन् पार्थ पवारांचा इशारा

मातेसमान नदीतून पैसे खाण्याच्या या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत जाणार असल्याचा इशारा पार्थ यांनी दिला आहे.
विलास लांडेंची अजितदादांकडं तक्रार अन् पार्थ पवारांचा इशारा
Vilas Lande, Parth Pawar

पिंपरी : भाजपची (BJP) सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदी सुधार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मंगळवारी (ता.१२) तक्रार करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी लगेचच दखल घेत भाजपवर निशाणा साधला आहे.

मातेसमान नदीतून पैसे खाण्याच्या या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत जाणार असल्याचा इशारा पार्थ पवार यांनी बुधवारी (ता.१३)दिला. हीच का स्मार्ट सिटी असा प्रश्नही त्यांनी विचारला. पवार व लांडे या जोडीने शहरातील इतर प्रश्नांतही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. त्यातून चार महिन्यांवर आलेल्या पिंपरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते अधिक सक्रिय व आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पार्थ यांच्या इशाऱ्याने भाजपच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Vilas Lande, Parth Pawar
केंद्रीय मंत्र्यांनी थेट अमेरिकेत जाऊन केला लखीमपूर खीरी घटनेचा निषेध

स्थायी समितीतील टक्केवारी तथा लाचखोरी ऑगस्टमध्ये उघडकीस आल्यानंतर त्यांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. परिणामी, आक्रमक भाजपला या प्रकरणामुळे काहीसा बचावात्मक पवित्राही घ्यावा लागला होता. स्मार्ट सिटीच्या कामातही अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याअगोदरच केलेली आहे. त्याचीही त्यांनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे त्यात वा नदीसुधार वा आरोप झालेल्या पालिकेच्या अन्य निविदा गैरव्यवहारातही निवडणुकीच्या तोंडावर भाजपमागे चौकशी लागण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर पुन्हा सत्तेत येण्याचे व शंभरप्लस नगरसेवक निवडून आणण्याच्या त्यांच्या निर्धाराला धक्का बसणार आहे.

पिंपरी पालिका निवडणूकीचे सारथ्य पार्थ हेच करणार असल्याच्या चर्चेलाही त्यांच्या सक्रियतेतून दुजोरा मिळतो आहे. शहरातून वाहणारी व पुढे आळंदीला जाणारी इंद्रायणी तसेच पवना नदीच्या शेकडो कोटी रुपयांच्या नदीसुधार प्रकल्पात पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कोट्यवधी रुपयांची कामे काढली आहेत. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देवाच्या आळंदीत सुद्धा सत्ताधा-यांनी पैसे खाण्याचा आपला धंदा सोडला नाही, असा हल्लाबोल लांडे यांनी मंगळवारी (ता.१२) केला होता. त्याला आता वरिष्ठ नेत्यांचीही साथ मिळाल्याचे दिसून आले.

नदीसुधार प्रकल्पात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची पार्थ यांची लगेचच दखल घेतली. सर्वांच्याच अस्मितेचा हा विषय असल्याचे सांगत नदीतून पैसे खाण्याच्या उद्योगाबाबत तक्रार प्राप्त झाल्याचे ट्विट त्यांनी आज केले. पवना आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाच्या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत आम्ही जाणार आहोत, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. तर, पिंपरी-चिंचवडमधील वृक्षगणना न झाल्याची दखलही त्यांनी आज घेतली. त्याबद्दल स्थानिक तरुण विरोध करीत असल्याची दुसरी तक्रार मिळाल्याचे त्यांनी दुसरे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच हा प्रश्न सबंधित खात्याकडे नेणार असल्याचे आश्वासनही पार्थ यांनी दिले आहे.

Related Stories

No stories found.