
Pune News: माळेगावमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या ४० तरुणींची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. याबरोबरच शारदानगर येथील अद्वैत लक्ष्मण भोसले या तरुणाने केंद्रीय सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या (आर्मी,टेक्निकल इन्ट्री स्किम -४९) परिक्षेत देशात तिसरी रॅंक मिळविली. त्यानिमित्त त्याचाही सन्मान यावेळी अजित पवारांनी केला.
"इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश संबंधित विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. त्यांचा माझ्यासह बारामतीकरांना सार्थ अभिमान वाटतो", अशा शब्दात अजित पवारांनी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शेतकरी कुटुंबातील युवतींनी आपला कणखरपणा दाखवत आणि क्रीडा संकुलातील भरतीपूर्व प्रशिक्षण घेत, मनात ध्येय साध्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती ठेवत, माळेगाव (ता.बारामती) येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ४० युवती यंदा पोलीस सेवेत भरती झाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिपक तावरे व प्रशिक्षक लक्ष्मण भोसले यांच्या पुढाकारातून या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते घेण्यात आला. यावेळी पार पडलेल्या या आनंदसोहळ्याची क्षणचित्र पाहून उपस्थित काही पालकांसह मुलींना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, "माळेगावच्या यशस्वी मुलींनी स्वयंपूर्ण होऊन आपल्यासाठी एक वेगळी वाट निवडली. खाकी वर्दीतील रुबाबदार मुलगी जेव्हा गणवेशात घरी जाईल, त्यावेळी पालकांसह समाजाचा नक्की अभिमानाने ऊर भरून येईल".
"ग्रामीण भागातील होतकरू व गरीब मुलामुलींना पोलीस दलासह विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मात्र, माळेगावच्या युवतींनी कणखरपणाच्या जोरावर व प्रशिक्षक लक्ष्मण भोसले, दीपक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले. याचा मला मनस्वी आनंद आहे ", असं अजित पवार यावेळी म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.