
पुणे : "ज्यांनी भोंग्याचा मुद्दा समोर आणला त्यांना माध्यमांनी आता गाडीत बसले, चालले, उतरले आता औरंगाबदला पोचले, रूमचा दरवाजा उघडला अशाप्रकारे प्रसिद्धी दिली. मात्र, तो माध्यामांचा अधिकार आहे. पण या माणसाने आजपर्यंत जे आंदोलनं केले त्यातील एकही यशस्वी झाले नाही. त्यांच्या या आंदोलनामुळे आतापर्यंत राज्याचे आणि समाजाचे नुकसानच झाले आहे,`` अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आंदोलनावर टीका केली. त्याचबरोबर राज ठाकरेंनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा पाढा वाचत पवारांनी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Ajit Pawar criticizes Raj Thackeray)
पवार म्हणाले की, मागे याच व्यक्तीने सांगितले होते की टोल बंद करणार पण काय झाल? एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काहीच झालं नाही. राज ठाकरेंची आतापर्यंत केलेली आंदोलने ही राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. टोल बंद झाली तर देशातील राष्ट्रीय महामार्गांची जी कामे झाली त्याचे काय होईल? नितिन गडकरी हे वारंवार सांगत आहेत की, टोल घेतल्यामुळेच महामार्गाचे काम झाले आहे. आता समृद्धी महामार्गाचे काम 45 हजार कोटींचे सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्गचे काम त्याकाळात झाले. मात्र त्याच्या दुरूस्तीचे कामकाज हे टोल घेतला नसता तर झाले असते का? छोट्या रस्त्यावर टोल योग्य नाही ते आपण काढले आहे. हे त्यांचं टोलचं आंदोलन फेल गेलं.
तर दुसरे आंदोलन युपी-बिहार वाल्यांनो चले जाव म्हणाले. हे आंदोलन केल्यावर मु्ंबई, पुणे, नाशिक, औंगगाबाद येथे बांधकाम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते. तेव्हा त्या लोकांना पुन्हा आणाव लागलं त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली. त्यानंतर हॅाकर्स हटवा, फेरीवाल्यांना किंवा टॅक्सीवाल्यांना दोन-चार जण मारतात मग त्यांना फुकट प्रसिद्धी मिळते. काही लोकांना करोडो रूपये खर्च करून प्रसिद्धी मिळते मात्र, काहींना न काही करताच प्रसिद्धी मिळत आहे, असा टोलाही पवारांनी ठाकरेंना लगावला.
भोंग्याच्या मुद्द्यावरूनही पवारांनी राज यांच्यावर टीका केली. भोंग्याबद्दल नियमावर बोट ठेवायचे म्हटले तर सगळ्यांचीच पंचाईत होईल. आवाजाच्या डेसिबलची मर्यादा मोजायची झाली तर जे सूर्यास्तानंतर सभा घेणे अवघड होईल. म्हणजे हाताने धोंडा पायावर पाडल्यासारखे होईल. असे ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने धमकी दिली आहे, त्याबद्दस विचारले असता, तिकडे जाणाऱ्यांनीच याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.