नारायण राणेंचा भरोसा पुण्याच्या बाळासाहेबांवर! 

तसे पाहिले तर ती व्यक्ती राजकीय नेता वगैरै काही नव्हती. पुण्याच्या सहकार क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत असलेले विद्या सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर ऊर्फ बाळासाहेब अनास्कर एक बॅंकर म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहेत. या अनास्करांवर नारायण राणेंचा मोठा भरोसा आहे. त्यामुळेच आपल्या नव्या इनिंगची घोषणा बाळासाहेबांच्या उपस्थितीच झाली पाहिजे, इतका विश्‍वास आणि मैत्री नारायण राणे यांनी त्यांच्याशी जपली आहे.
नारायण राणेंचा भरोसा पुण्याच्या बाळासाहेबांवर! 

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एक ऑक्टोबरला दुपारी एक वाजता आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान या नव्या पक्षाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलविली होती. मात्र तरीही एक वाजून गेला तरी पत्रकार परिषद सुरू झाली नव्हती. कारण नारायण राणे एका व्यक्तीला शोधत होते. 

राणे यांच्या उजव्या हाताला त्यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे आणि डाव्या हाताला माजी आमदार श्‍याम सावंत बसले होते. ती व्यक्ती नको नको म्हणत असताना त्यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. ते आल्यानंतर निलेश राणे त्यांना बसण्यासाठी जागा करून द्यावी म्हणून उठू लागले. मात्र राणेंनी निलेश यांना तेथेच बसण्यास सांगितले आणि शेजारी असलेल्या सावंतांना पलीकडच्या खुर्चीवर बसायला सांगितले. सावंतांच्या जागेवर ती व्यक्ती बसली. 

बहुतांश वाहिन्या राणेंची पत्रकार परिषद लाइव्ह दाखवत होत्या. त्यामुळे साऱ्यांनाच हे दृश्‍य दिसले. तसे पाहिले तर ती व्यक्ती राजकीय नेता वगैरै काही नव्हती. पुण्याच्या सहकार क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत असलेले विद्या सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर ऊर्फ बाळासाहेब अनास्कर हे एक बॅंकर म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहेत. या अनास्करांवर नारायण राणेंचा मोठा भरोसा आहे. त्यामुळेच आपल्या नव्या इनिंगची घोषणा बाळासाहेबांच्या उपस्थितीच झाली पाहिजे, इतका विश्‍वास आणि मैत्री नारायण राणे यांनी त्यांच्याशी जपली आहे. 

राणे हे कोकणातील. त्यांची सारी कारकिर्द बहरली मुंबईत. तर बाळासाहेबांची सारी कारकिर्द बहुतांश पुण्यातील. तरीही या दोघांत स्नेह निर्माण झाला. राणे यांना कोणत्याही प्रश्‍नात सल्ला हवा असला तर ते बाळासाहेबांना फोन केल्याशिवाय राहत नाही. या दोघांच्या पत्नींचेही एकमेकींशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 

अनास्कर यांनी पतित पावन संघटनेत सलग 15 वर्षे "शहर पालक' पदावर पुण्यात काम केले. नंतर संधी असतानाही सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. त्यांचा आणि राणेंचा पहिला संबंध 1995 मध्ये आला. इंदापूरमध्ये पतित पावनचे प्रदीप गारटकर यांच्यासाठी शिवसेना आणि भाजप युतीने जागा सोडावी, अशी मागणी करण्यासाठी अनास्कर हे "मातोश्री'वर गेले होते. तेव्हा नारायण राणे तेथे हजर होते. तेव्हापासून त्यांची मैत्री झाले. त्यानंतर राणे यांचे तेव्हाचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे आमदार विनायक निम्हण यांच्यामुळे या मैत्रीचे रूपांतर स्नेहात झाले. तेव्हापासून सुरू असलेला हा मैत्रीचा सिलसिला आजही कायम आहे. राणे यांच्या नव्या पक्षाची घटना, त्याची रचना याबाबत अनास्करांनी त्यांना सहकार्य केले. 

याबाबत बोलताना अनास्कर म्हणाले,""मैत्री हा माझा "वीक पॉइंट' आहे. सर्वच पक्षांतील मंडळींशी माझे चांगले संबंध आहेत. सहकार क्षेत्रात काम करत असल्यामुळे पक्ष पाहून कधी कोणाला मदत केली नाही. राणे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांना जेव्हा माझी गरज वाटणार, तेव्हा मी तेथे हजर असणार हे नक्की!'' 
राणे यांच्या स्वाभिमान पक्षात सक्रिय भूमिका बजावणार या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""मित्र म्हणून त्यांना माझी मदत लागली तर ती करणे माझे कर्तव्यच आहे.'' आता अनास्करांची नवीन इनिंग सुरू होणार की नाही, याचीच उत्सुकता आहे..  

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in