नानांची स्वबळाची भाषा;...पण पुणे-पिंपरीत वस्तुस्थिती तशी आहे ?

पिंपरी कॉंग्रेसची स्थिती दयनीय आहे. तिथे शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष होण्यासाठी कुणी सक्षम कार्यकर्ता मिळत नव्हता.
नानांची स्वबळाची भाषा;...पण पुणे-पिंपरीत वस्तुस्थिती तशी आहे ?
Nana PatoleSarkarnama

पुणे : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शनिवारी पुणे-पिंपरीत मेळावे घेत स्वबळावर लढण्याचा नारा दिला.स्वबळावर लढण्याची त्यांची भाषा आधीपासूनच आहे.मात्र, या दोन्ही शहरात संघटनेची स्थिती अत्यंत नाजूक आहे. सध्याच्या महापालिकेत पिंपरीत शून्य तर पुण्यात डझनभर नगरसेवक नाहीत, अशी या एकेकाळच्या बलाढ्य पक्षाची स्थिती आहे.या स्थितीत स्वतंत्र लढण्याचा त्यांचा नारा शेवटपर्यंत टिकणार की राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर फरफटत जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Nana Patole
नितेश राणेंना कोल्हापूरला हलवणार; सीपीआर रुग्णालयात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

पिंपरी कॉंग्रेसची स्थिती दयनीय आहे. तिथे शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष होण्यासाठी कुणी सक्षम कार्यकर्ता मिळत नव्हता. तीन महिन्यांपूर्वी अखेर अध्यक्ष मिळाला. पुणे व पिंपरीत एकेकाळी निर्विवाद सत्तेत असलेल्या या पक्षाची अशी स्थिती असताना ‘एकला चलो’ची भाषा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पटोले करीत आहेत. ही भूमिका घेताना दोन्ही शहरात पक्षाच्या स्थितीचा नेमका अंदाज त्यांनी घेतला असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

Nana Patole
किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

पुण्यात पक्षाचा परंपरागत मतदार आहे. मात्र, संघटना कमकुवत आहे. गेल्या दहा वर्षात विविध गटा-तटात विभागलेली कॉंग्रेस एकरूप होण्यासाठी जे नेतृत्व लागतं ते नेतृत्व दुर्देवाने पक्षाकडे नाही. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या शहराकडे राज्य पातळीवरील नेतृत्वाचे लक्ष नाही हे गेल्या दहा वर्षात स्पष्ट झाले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्यासारख्यांकडे शहराचे नेतृत्व दिले तर शहरातील संघटनेला चालना मिळेल.गटातटाच्या राजकारणातून कॉंग्रेस मुक्त होईल.मात्र, हे करण्यासाठी या नेत्यांची आणि राज्य पातळीवरील पक्षाच्या नेतृत्वाची इच्छाशक्ती नाही की काय अशीच सध्याची स्थिती आहे.

पुण्यातल्या कॉंग्रेसला मोठी परंपरा आहे.जेधे-गाडगीळांपासून अलिकडे अगदी सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत अनेकांनी कॉंग्रेसचे एकमुखी नेतृत्व केले. या काळात कॉंग्रेसकडे पुण्याची निर्विवाद सत्ता होती.आजही तळागाळात या पक्षाला स्थान आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात संघटना रसातळाला गेली.कलमाडी यांचे संपलेले नेतृत्व आणि कॉंग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी पुण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे पक्षावर आज ही स्थिती ओढावली आहे.

या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा प्रत्यक्षात कितपत उतरेल आणि उतरली तर त्याला कितपत यश येईल,याबाबत साशंकता आहे.प्रेरणादायी भाषण करणे नेत्याचे काम आहे. त्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो.त्यामुळे अशी भाषणे देणे योग्यच आहे. हे काम प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले जोमाने करत आहेत. मात्र, त्याचबरोबर संघटनेत लक्ष घालून प्रश्‍न सोडविण्याची नेत्याची तयारी असायला हवी. अशी तयारी नाना पटोले दाखवणार का? हा खरा प्रश्‍न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in