अजितदादा आपला शब्द खरा करणार : पालिका निवडणुकांसाठी द्विसदस्यीय प्रभाग असणार?

राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभागाची मागणाीच मान्य होण्याची शक्यता वाढली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

पिंपरी : राज्यातील तत्कालीन सत्ताधारी भाजपने २०१७ मध्ये दोनऐवजी चारचा प्रभाग केल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतरही ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्ता गेल्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची धारणा आहे. त्यामुळे सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने लगेच ती रद्द करून एकची केली. तर, तीसुद्धा फायदेशीर ठरणार नसल्याचे लक्षात येताच राज्य मंत्रिमंडळाने ही आगामी निवडणूक (मुंबई महापालिका वगळता) बहुसदस्यीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ही निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीनेच होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. प्रत्यक्षात ती दोनच्या  रचनेनुसार झाली, तरच मोठा फायदा होणार असल्याने तशी मागणी राष्ट्रवादीने आता लावून धरली आहे. परिणामी आता पुन्हा ही निवडणूक यापूर्वी सत्ता मिळालेल्या दोन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनेच करण्याचा विचार सरकारने सुरु केला आहे. (Municipal elections will be held in two-member ward system)

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही एकऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा आपलाच निर्णय महाविकास आघाडीने नुकताच फिरवला. आता ती बहुसदस्यीय प्रभाग रचनेने घेण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. त्यात ग्यानबाची मेख आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकऐवजी बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात याव्यात, असे त्यात म्हटले आहे. म्हणजे त्या एकच्या प्रभाग रचनेनुसार होणार नाहीत, तर त्या दोन, तीन वा चार प्रभाग पद्धतीने होऊ शकतात, असा त्याचा अर्थ आहे. यापूर्वी त्या चारने झाल्या आहेत. त्याचा फटका बसल्याने आता पुन्हा त्या चारने होणार नाहीत. त्रिसदस्यीयमध्ये फटका बसणार असल्याचा अंदाज आला आहे. किमान राष्ट्रवादीचा तरी तसा समज झालेला आहे. त्यात त्रिसदस्यीय पद्धत तांत्रिकदृष्ट्या प्रशासनालाही अडचणीची ठरणार आहे.

Ajit Pawar
कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे झाले पुन्हा सक्रिय

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ३३ टक्के नाही, तर ५० टक्के आरक्षण आहे, त्यामुळे दोनच्या प्रभागात सरळ एक प्रभाग महिलांसाठी ठेवणे सोयीचे होणार आहे. तीनमध्ये मात्र त्रांगडे निर्माण झाले असते. एका प्रभागात एक जागा, तर दुसरीकडे दोन जागा महिलांसाठी सोडाव्या लागल्या असत्या वा सोडाव्या लागणार आहेत. ही अडचण दोन सदस्य प्रभाग रचनेत आपोआप दूर होणार असल्याने राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभागाची मागणाीच मान्य होण्याची शक्यता वाढली आहे. त्याला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दुजोरा दिला आहे. अंतिम निर्णय सर्वांशी चर्चा करून घेऊ,असेही त्यांनी पुण्यात सांगितले आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील कॉंग्रेस व  शिवसेना या पक्षांचा द्विसदस्यीय पद्धतीला विरोध असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच (ता.२६) खुलासा केला. त्रिसदस्यीय पद्धतीला आमचा विरोध नसल्याचे त्यांनी अकोला (जि. नगर) येथे बोलताना स्पष्ट केले. एवढेच नाही, तर ही निवडणूक दोन सदस्य पद्धतीने करण्याचा ठराव पक्षाने केला असल्याचे सांगत तशी विनंती सरकारला केल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानुसार बदल होईल, अशी खात्रीही त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे द्विसदस्य प्रभाग पद्धतीला कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

Ajit Pawar
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखी एकजूट दाखवा, सगळे प्रश्न सुटतील..

पिंपरी-चिंचवडमध्ये काल बोलताना ‘चारचा प्रभाग झाल्याने फटका बसला, हे चुकीचे असून आपला पाया ठिसूळ होतो. लोकापर्यंत पोचण्यात आपण कमी पडलो,’ असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. त्यातून त्यांचाही द्विसदस्य रचनेला विरोध राहिला नसल्याचे सूचित होत आहे. तसेच, त्यांची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत एकचाच प्रभाग राहणार आहे. एकूणच द्विसदस्यीय पद्धतीवर आता एकमत झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसारच महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल, अशी शक्यता वाढली आहे. त्रिसदस्यीयऐवजी ती दोननुसार झाली,तर पक्षाला अधिक फायदा होणार आहे. त्यामुळेच द्विसदस्यीय पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह इतरही निवडणुका घेण्याची आमची मागणी आहे, असे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com