
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या (गट-क) उत्तरतालिकेवर (ॲन्सर की) आक्षेप घेत याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी पुण्यात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
‘पीएसआय’, ‘एएसओ’ तसेच ‘एसटीआय’ या पदांसाठी सप्टेबर २०२१ ला संयुक्त पूर्व परीक्षा झाली. सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेची पहिली उत्तरतालिका (ॲन्सर की) लावण्यात आली. त्यातील आक्षेप दुरूस्त करण्यासाठी दुसरी ‘ॲन्सर की’ लावण्यात आली. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविल्याने आयोगाने ‘तिसरी ॲन्सर’ की लावली. यास काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत प्रशासकीय न्यायाधिकारणात (मॅट) धाव घेतली. ‘मॅट’चा निकाल विरोधात गेल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मुंबई, नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
‘ॲन्सर की’मध्ये ज्यांना चांगले गुण मिळत आहेत अशा काही विद्यार्थ्यांनी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांकडे याचिका मागे घेण्याची विनंती केल्यानंतर एकमेकांवर आरोप करीत हा प्रकार पोलिसांपर्यंत गेला आहे. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा गेल्या महिन्यात अपेक्षित होती. मात्र, ‘ॲन्सर की’ वरून सुरू झालेली कोर्टबाजी सुरूच राहिल्याने मुख्य परीक्षेचे भविष्य अधांतरीत राहिले आहे. त्यातून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
या संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित असताना काही विद्यार्थ्यांकडून याचिकाकर्त्यांना धमकी आणि सोशल मीडियावरुन शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत काही विद्यार्थ्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.